दोन दिवसांपासून केलेल्या अंमलबजावणीचा दृश्य परिणाम

ठाणे : माजिवडा येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी माजिवडा नाका चौकात वाहतूक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ डिसेंबरपासून हे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. या बदलांमुळे चौकात होणारी वाहतूक कोंडी ५० टक्क्यांनी घटल्याचा दावा वाहतूक पोलिसांकडून केला जात आहे.

घोडबंदर, नाशिकहून ठाणे, मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी माजिवडा चौक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. चौकात सहा मार्ग एकमेकांना मिळतात. त्यामुळे दररोज बेशिस्त पद्धतीने येथील वाहतूक सुरू असते. याचा परिणाम चौकात वाहतूक कोंडी होऊन गोकूळनगर, माजिवडा, कापूरबावडी परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. यावर उपाय म्हणून २९ डिसेंबरपासून या चौकात प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल सुरू केले आहे. त्यानुसार, विवियाना मॉलच्या दिशेकडून माजिवडा चौक, गोकुळनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना माजिवडा चौकात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील वाहने फ्लॉवर व्हॅली सेवा मार्गावरून रुणवाल प्लाझा चौकातून जातील, असे ठरविण्यात आले आहे. तसेच विवियाना मॉल येथून आर. सावंत मार्गे राबोडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना माजिवडा चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने गोल्डन क्रॉस येथून गोल्डन डाइज मार्गे जातील.

माजिवडा सेवा रस्त्याने गोल्डन डाइज नाका, माजिवडा पूल, कॅडबरी जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना गोल्डन डाइज नाका हनुमान मंदिर येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने माजिवडा सेवा गोल्डन क्रॉस येथून जातील.

राबोडी येथून आर. सावंत मार्गे कॅडबरीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना हनुमान मंदिर येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने गोल्डन डाइज नाका येथून जातील. तसेच गोकूळनगरहून माजिवडा नाका हनुमान मंदिरजवळ कॅडबरी जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना हनुमान मंदिरपासून एकदिशा मार्ग करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावर वाहतूक बदल लागू केल्याने चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीत ५० टक्क्यांची घट झाल्याचे कापूरबावडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंभाते यांनी सांगितले. तसेच महिन्याभराच्या प्रायोगिक तत्त्वावर हे बदल लागू करण्यात आले असून नागरिकांचा आक्षेप असल्यास त्यांनी वाहतूक पोलिसांच्या तीन हात नाका येथील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हरकती न आल्यास हे बदल कायमस्वरूपी लागू होतील, असेही पोलिसांनी स्पष्ट केले