ठाणे : भिवंडी येथे सोमवारी दुपारी कशेळी ते अंजुरफाटा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मागील आठवडाभरापासून हीच परिस्थिती असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. वाहतुक कोंडीमुळे शाळेच्या बसगाड्या कोंडीत अडकू लागल्या आहेत. कोंडीमुळे शाळेचे बसगाडी चालक बाळकूमपुढे वाहतुक करण्यास टाळत असल्याने कशेळी, काल्हेर भागात राहणाऱ्या पालकांना पायी दीड ते दोन किमी अंतर पार करुन विद्यार्थ्यांना घरी आणावे लागत आहे. जड-अवजड वाहनांची गोदामात होणारी वाहतुक, विरुद्ध दिशेने वाहने चालविल्याने तसेच काही ठिकाणी रस्त्यांची झालेली दैना यामुळे ही वाहतुक कोंडी होऊ लागली आहे.
भिवंडी येथील कशेळी, काल्हेर, पुर्णा भागात गेल्याकाही वर्षांपासून नागरिकरण वाढले आहे. अंजुरफाटा, मानकोली, राहनाळ भागात गोदामे असल्याने येथून अवजड वाहनांची वाहतुक देखील वाढली आहे. सोमवारी या भागात दोन्ही मार्गिकेवर अंजुरफाटा ते कशेळी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहन चालकांना अवघ्या १५ ते २० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी सुमारे पाऊण ते एक तास लागला. काल्हेर, कशेळी भागातील अनेकजण त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी ठाणे शहरातील शाळेत पाठवितात. या मार्गावरील वाहतुक कोंडीमुळे शाळेच्या बसगाड्यांचे चालक ठाणे-भिवंडी शहराची सिमा असलेल्या बाळकूमच्या पुढे येण्यास मनाई करतात. त्यामुळे अनेकदा पालकांना बाळकूम ते कशेळी पर्यंत चालत विद्यार्थ्यांना आणावे लागत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना, पालकांना शारिरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
नोकरदारांनाही ठाण्याहून घरी जाताना हाल सहन करावे लागतात. वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून कोंडीतून केव्हा सुटका होईल असे नागरिक विचारत आहेत. जड-अवजड वाहनांची गोदामाच्या दिशेने होणारी वाहतुक होते. गोदामाच्या दिशेने जाणारे मार्ग अनेक ठिकाणी खराब आहेत. त्यामुळे त्याचा भार मुख्य मार्गांवर येतो. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी अनेकजण विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. त्यामुळे कोंडीत भर पडते. तसेच कशेळी पुलासह या मार्गावर काही ठिकाणी खड्डे असल्याने ही कोंडी होत आहे. याबाबत ठाणे वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना विचारले असता, काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहतुक करतात. वाहतुक कोंडी सोडविण्याचे प्रयत्न पोलीस करतात असे त्यांनी सांगितले.