कळवा, साकेत भागात अवजड वाहनांच्या रांगा

ठाणे : वाहतूकदारांचा संप मिटताच ठाणे-कळवा मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. कळवा, साकेत भागात मंगळवारी सकाळपासून अवजड वाहनांच्या लांब रांगा लागल्याने येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली होती. मंगळवारी सकाळपासूनच कोंडीमुळे साकेत पूल, विटावा आणि जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली ही कोंडी दुपारी उशिरापर्यंत कायम होती. त्यामुळे कळवा-मुंब्रा तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरून ठाण्याच्या दिशेने ये-जा करणारे प्रवासी या कोंडीत सापडले होते. माल वाहतूकदारांचा संप मिटल्यामुळे रस्त्यावर अवजड वाहनांचा भार पुन्हा वाढला असून त्यामुळे ही कोंडी झाल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे.

ठाणे आणि कळवा शहराला जोडण्यासाठी खाडीवर तिसरा पूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामामुळे गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या कोंडीमुळे या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी हैराण झाले आहेत. सोमवारी सकाळी सात वाजता सुरू झालेली वाहतूक कोंडी सायंकाळपर्यंत कायम होती. ही कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली होती. असे असतानाच सलग दुसऱ्या दिवशी या मार्गावर पुन्हा याच वेळेत वाहतूक कोंडी झाली. कळवा नाक्यापासून साकेत पुलापर्यंत, कळवा नाक्यापासून विटावापर्यंत आणि कळवा नाक्यापासून जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. ही कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत सुरू होती. ठाणे-बेलापूर मार्गावरील नवी मुंबईहून कळव्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी विटाव्यापर्यंत चार पदरी रस्ता आहे. त्यापुढे मात्र दोन पदरी रस्ता असून त्या ठिकाणी पूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे दहा मिनिटांच्या प्रवासासाठी पाऊण तासांचा अवधी लागत असून मंगळवारी पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागत होता.

काही दिवसांपूर्वी माल वाहतूकदारांचा देशव्यापी संप सुरू होता. या काळात अवजड वाहतूक बंद असल्यामुळे रस्त्यांवर वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी हा संप मिटल्यामुळे ही वाहने पुन्हा रस्त्यावर आली आहेत. एकाच वेळी ही वाहने रस्त्यावर आल्यामुळे शहरावर अवजड वाहतुकीचा भार वाढला असून यामुळे कळवा-साकेत मार्गावर मंगळवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला. या संदर्भात कळवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. गेल्या दोन दिवसांपासून या भागात होणारी कोंडी सोडवण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले असून त्यांच्यामार्फत वाहतूक सुरळीत करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कळव्यात कोंडी कायम

कळवा पुलावरही वाहतूक कोंडीची समस्या कायम असते. गेल्या महिन्यात मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. या मार्गावरील वाहने ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहेत. मात्र, त्या ठिकाणी पथकर घेतला जात असल्यामुळे अनेक जण कळवा-विटावा मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे या मार्गावर कोंडीची समस्या निर्माण होत आहे, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.