Traffic department action against 1500 vehicle drivers in Dombivli Kalyan news ysh 95 | Loksatta

डोंबिवली-कल्याणमधील १५०० वाहन चालकांवर वाहतूक विभागाची कारवाई

कल्याण-डोंबिवली, कोळसेवाडी वाहतूक विभागाने रविवारी दिवसभर विशेष तपासणी मोहीम राबवून एक हजार ५०० वाहन चालकांवर कारवाई केली.

traffic police
डोंबिवली-कल्याणमधील १५०० वाहन चालकांवर वाहतूक विभागाची कारवाई

आठ लाख रुपयांचा दंड वसूल

कल्याण: कल्याण-डोंबिवली, कोळसेवाडी वाहतूक विभागाने रविवारी दिवसभर विशेष तपासणी मोहीम राबवून एक हजार ५०० वाहन चालकांवर कारवाई केली. या वाहन चालकांकडून वाहतूक विभागाने एक दिवसात सुमारे आठ लाख रुपयांचा दंड वसूल केला. सर्वाधिक वाहन चालक हे दर्शक यंत्रणा (वाहतूक सिग्नल) न जुमानता वाहन चालवित असल्याचे आढळून आले आहेत, अशी माहिती कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

वाहतूक विभागाच्या वरिष्ठांच्या आदेशावरुन कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी रविवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्या वाहतूक हद्दीत वाहतूक पोलीस, वाहतूक सेवकांच्या साहाय्याने विविध रस्त्यांवर वाहन तपासणी मोहीम राबविली.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : शिंदे सरकारचा भाजपाच्या सरकारकडे जाणूनबुजून कानाडोळा, राऊतांचा आरोप; राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

अचानक सुरू झालेल्या या तपासणी मोहिमेमुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली होती. बस, रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने या तपासणी मोहिमेत तपासण्यात आली. ४५४ वाहन चालक हे दर्शक यंत्रणेला न जुमानता वाहन चालवित असल्याचे आढळून आले. त्यांना बेशिस्तीने वाहन चालविल्याबद्दल दंडात्मक रकमेच्या ई चलान पध्दतीने नोटिसा पाठविल्या आहेत.

हेही वाचा >>> बांधकाम साहित्य पुरवठ्यावरुन डोंबिवलीत तरुणांच्या दोन गटात हाणामारी

बेशिस्तीचे प्रकार

मद्यपान करुन सुसाट वाहन चालविणे २५ वाहन चालक, विनाशिरस्त्राण २५० वाहन चालक, आसनपट्टा न लावणे १०० तक्रारी, रिक्षेत चौथा प्रवासी ९५ तक्रारी, विनापरवाना वाहन चालविणे ५० वाहन चालक, गणवेश परिधान न करणे २५ तक्रारी, दर्शक तोडून वाहन चालविणे कोळसेवाडी विभाग १४४, कल्याण पश्चिम १३५, डोंबिवली विभाग १०५. वाहन क्रमांक फेरबदल १० तक्रारी.

हेही वाचा >>> कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुटणारे तीन जण अटक

दंडात्मक कारवाई

कल्याण पश्चिमेत दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यामधील चार वाहन चालकांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि त्यांचा परवाना सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आला. दोन मद्यपींना १५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यांचाही वाहन परवाना रद्द करण्यात आला, अशी मााहिती वरिष्ठ निरीक्षक तरडे यांनी दिली. कोळसेवाडी वाहतूक विभागाने चार मद्यपींना १० हजार रुपये दंड आकारला आहे. इतर बेशिस्त वाहन चालकांकडून ई चलान, स्थळावरच दंडात्मक कारवाई केली आहे, असे कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले. डोंबिवलीत एक मद्यपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती डोंबिवली विभागाचे वरिष्ठ निरीक्षक गित्ते यांनी दिली.

“कल्याण, डोंबिवली विभागातील वाहन चालकांना वाहतुकीची शिस्त लागावी. वाहतूक नियमभंग केला तर मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. याची जाणीव व्हावी या उद्देशाने रविवारी दिवसभर वाहतूक विभागाने तपासणी मोहीम राबविली. बेशिस्त वाहन चालकांवर दंड आणि वाहन परवाना निलंबित करण्याच्या कारवाई केल्या. ही मोहीम सुरूच राहणार आहे. ”

-महेश तरडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 14:34 IST
Next Story
ठाणे: दुचाकींची एकमेकांना धडक, भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू; मुलगा जखमी