डोंबिवली : डोंबिवली पश्चिम कोपर उड्डाण पूल येथे वाहने पुलावर चढताना आणि उतरताना आणि वळण घेताना समोरासमोर येतात. त्यामुळे कोपर उड्डाण पुलावर पश्चिम बाजूला नियमित वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी डोंबिवली वाहतूक विभागाने कोपर उड्डाण पुलावरील वाहतुकीत सोमवारपासून पुढील तीस दिवस प्रायोगिक तत्वावर बदल केला आहे. हा बदल यशस्वी झाल्यास हा बदल कायमस्वरूपी लागू करण्याचा वाहतूक विभागाचा प्रयत्न आहे.
कोपर उड्डाण पूल पश्चिम येथे डोंबिवली पश्चिमेतून पंडित दिन दयाळ रस्ता येथे जाताना, कोपर रस्ता भागातून पुलावर चढताना आणि डोंबिवली पूर्व भागातून पश्चिम दिशेने पंडित दिन दयाळ रस्ता, कोपर रस्ता भागात उतरताना नेहमी वाहने समोरा समोर येऊन वाहन कोंडी होत होती. डोंबिवली वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी या कोंडी विषयी वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांना कोपर पुलावरील वाहतूक बदलाबाबत एक प्रस्ताव दिला होता. हा बदल वाहतूक विभागाच्या उपायुक्तांनी मान्य करून पुढील तीस दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर अंमलात आणण्यास मंजुरी दिली आहे. या बदलाविषयी कोणाही नागरिकाला काही हरकत असेल त्यांनी वाहतूक विभागाच्या तीन हात नाका येथील वाहतूक उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त वाहतूक कार्यालयाने केले आहे.
वाहतूक बदल
डोंबिवली पूर्वेतून कोपर उड्डाण पुलावरून पश्चिमेत येणाऱ्या आणि पंडित दिनदयाळ रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोपर पूल उतरणीवर साऊथ इंडियन शाळेसमोर प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने उतरणीवर डावे वळण घेतील. तेथून ती श्रीमती मीनाताई ठाकरे उद्यान येथून उजवे वळण घेतील. पुढे तेजस इमारत येथे उजवे वळण घेतील. तेथून ती शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस थांब्याजवळ उजवे वळण घेऊन येतील. त्यानंतर ही वाहने डावे वळण घेऊन पं. दिनदयाळ रस्ता भागात जातील.
कोपर, शास्त्रीनगर रुग्णालय परिसरातून कोपर उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पूल उतरणीच्या मार्गावर साऊथ इंडियन शाळेसमोर प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने कोपर रस्त्याने सरळ पुढे जातील. जुनी डोंबिवली छेद रस्त्यावर सेंट्रल हाॅटेल जवळील रस्त्यावर यु टर्न घेऊन कोपर पुलाच्या दिशेने येतील.
जुनी डोंबिवली, कोपर मधील तेजस इमारत येथून श्रीमती मीनाताई ठाकरे उद्यान दिशेने कोपर रस्ता येथे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तेजस इमारत, जुनी डोंबिवली येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने तेजस इमारत येथून डावे वळण घेतील. तेथून नवी मुंबई परिवहन बस थांबा येथे उजवे वळण घेतील आणि तेथून कोपर रोडने पुढे डोंबिवली पश्चिम येथून इच्छित स्थळी जातील.
जुनी डोंबिवली रस्त्याने देवी चौकात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डोंबिवली पश्चिमेतील हाॅटेल सेंट्रल पॅलेस येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने ही वाहने पं. दिनदयाळ रस्ता स्वामी विवेकानंद विद्यालय रस्त्याने पुढे देवी चौककडे जातील. मीनाताई ठाकरे उद्यानालगतचा पश्चिमेचा रस्ता ते तेजस इमारतीपर्यंत शास्त्रीनगर रुग्णालया पाठीमागील रस्ता आणि एनएमएनटी बस थांबा भागात वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

