ठाणे : घोडबंदर भागात झालेल्या अपघातामुळे सोमवारी सकाळी संपूर्ण शहरात वाहतूक कोंडीचे चित्र होते. सुमारे १८ तास ठाण्यात वाहतूक कोंडी होती. वाहनचालकांना १० मिनिटांच्या अंतरासाठी तीन ते साडेतीन तास लागत होते. मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडीचा परिणाम अंतर्गत मार्गावरही झाला होता.

ही वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्याही नाकी नऊ आले होते. वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या एसटी-बसगाडय़ांतील प्रवाशांनी उतरून चालत जाण्याचा मार्ग निवडला. रविवारी रात्रीपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी सोमवारी दुपारी ४ वाजेनंतर सुटली.

घोडबंदर येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या तेलाच्या टँकरची धडक तीन कार आणि एका ट्रकला बसली. या घटनेत कारमधील तीन जण जखमी झाले. त्यांच्यावर मीरा भाईंदर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे टँकरमधील तेल दोन्ही मार्गिकांवर सांडले होते. त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला. रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांची वाहतूकही घोडबंदर मार्गाने सुरू होती. तेलाचा थर रस्त्यावर असल्याने अपघात टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने दोन्ही मार्गिकांची वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. सोमवारी पहाटे या तेलाच्या थरावर माती टाकण्यात आली. त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली. मात्र, वाहनांचा वेग अतिशय मंदावलेला होता. सोमवारी सकाळी वाहनांचा भारही वाढू लागला. त्यामुळे घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर गायमुख ते चिंचोटी फाटा आणि फाऊंटन उपाहारगृहापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. तर, ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गायमुख ते नितीन कंपनी पर्यंत वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी बसगाडय़ांतील प्रवाशांनी बसगाडय़ांतून उतरून पायी जाण्याचा पर्याय निवडला. तर काही जणांनी वाहतूक कोंडीमुळे पुन्हा घरचा रस्ता धरला. करोना प्रतिबंधक लशींच्या दोन मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच परवानगी आहे. अनेकांच्या लशींच्या दोन मात्रा घेऊन पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील नागरिक मुंबई नाशिक मार्गे ठाणे, मुंबईच्या दिशेने येत असतात. घोडबंदर येथे झालेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवरही झाला. मुंबई नाशिक महामार्गावर साकेत पूल ते मानकोलीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. येथील कोंडी टाळण्यासाठी काही वाहनचालकांनी कळवा मार्गे ठाणे, मुंबईत जाण्याचा मार्ग पत्करला. या मार्गावर वाहनांचा भार वाढून कळवा पूल ते माजीवडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. काही ट्रक-टेम्पोही वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्याही नाकी नऊ आले होते. अखेर दुपारी ४ नंतर वाहतूक कोंडी सुटली.