शहरांची महाकोंडी

महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे सर्वत्र वाहनांच्या रांगा

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे सर्वत्र वाहनांच्या रांगा

मुंबई, ठाण्यासह कल्याण, भिवंडी, नवी मुंबई या शहरांतून जाणाऱ्या महामार्गावर शुक्रवारी सकाळपासून निर्माण झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा मोठा परिणाम शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेवरही झाला. शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर झालेल्या कोंडीवर शहरांतील रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्याने शुक्रवारी सकाळी कामावर जाणारे नोकरदार तसेच शालेय विद्यार्थी भरवाटेत अडकून पडले. अवजड वाहतुकीचा भार, पावसामुळे पडलेले खड्डे, त्यात साचलेले पाणी, रस्त्यांची अर्धवट कामे आणि वाटेत बंद पडलेली वाहने यामुळे एकूणच मुंबई महानगर परिसरातील सर्वच महत्त्वाचे रस्ते शुक्रवारी ‘जॅम’ झाले होते. वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलिसांनी जादा कुमक रस्त्यावर उतरवली. परंतु, ही ‘महाकोंडी’ शुक्रवारी दुपापर्यंत दूर झाली नव्हती.

उरणच्या जेएनपीटी बंदरातून पनवेल मार्गे भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरूअसते. या मार्गावरील शिळफाटा चौकामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे येथील अवजड वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यात पनवेलकडून येणारी दोन अवजड वाहने शिळफाटा चौकाजवळ सकाळी सहा वाजता बंद पडली. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी येथील वाहतूक मार्गात बदल केले. त्याचा परिणाम अन्य रस्ते वाहतुकीवर झाला. एकाच मार्गिकेतून वाहनांची ये-जा सुरूअसल्याने शिळफाटा चौक परिसरातील वाहतुकीचे नियोजन कोलमडून पडले. त्यात सकाळी कामावर निघालेल्या खासगी वाहनांनी विरुद्ध मार्गावरून वाहने काढल्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली. दुसरीकडे, मुंब्रा रेतीबंदर येथील बा’ावळण मार्गाच्या पायथ्याशी खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी एकाच मार्गिकेवरून वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामांचाही वाहतूक व्यवस्थेला फटका बसला व भिवंडी-गुजरातहून जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या अवजड वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. या रांगा मुंबई-नाशिक महामार्गापर्यंत पोहोचल्याने तो महामार्गही ठप्प झाला. या मार्गावरील ठाण्यातील माजिवाडा ते पिंपळास पाडय़ापर्यंत अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीचा ताण घोडबंदर रस्त्यावर येऊन तेथील वाहतूकही विस्कळीत झाली.

मुंब्रा बाह्य़वळण आणि शिळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूकपोलिसांनी अवजड वाहने माजिवाडा, आनंदनगर मार्गे नवी मुंबईच्या दिशेने सोडण्यास सुरुवात केली. त्यात सकाळी मुंबईच्या दिशेने निघालेल्या नोकरदार वर्गाच्या खासगी वाहनांची भर पडली. त्यामुळे या मार्गावरही वाहतूक कोंडी झाल्याने त्याचा फटका ठाण्यातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेला बसला. ठाण्यातील तसेच महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे मुंबई, नवी मुंबईतील रस्तेही वाहनांनी गजबजून गेले. महामार्गावरील वाहतूक वळवल्याने पूर्व द्रूतगती महामार्ग आणि ठाणे-बेलापूर रस्ता या मार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळीच आपणास शिळफाटय़ावर वाहतूक कोंडी असल्याचे संदेश आले होते. त्यामुळे काटई टोल नाका येथे गेल्यानंतर आपण २० मिनिटे कोंडीत अडकलो. वाहने पुढे जाण्याची शक्यता नसल्याने आपण काटई टोल नाका येथे वळण घेऊन बदलापूर पाइपलाइन मार्गे तळोजा रस्त्याने नवी मुंबई प्रवास केला. माधव जोशी, प्रवासी

शिळफाटय़ाचे रुंदीकरण झाल्यानंतर तो प्रवासासाठी सुस्थितीत उपलब्ध होण्याऐवजी नेहमीच वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेला असतो. या कोंडीचे नेमके कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी प्रभावी उपाययोजना संबंधित यंत्रणांनी करणे आवश्यक आहे. एकदा वाहतूक कोंडी झाली की त्याचा विद्यार्थी, नोकरदार सर्वानाच फटका बसतो. या रस्त्यावर खड्डे पडत असतील तर त्यासाठी किमान पावसाळ्यापुरती स्थानिक पालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी खड्डे भरण्यासाठी तत्पर यंत्रणा तयार ठेवणे आवश्यक आहे.  मनीषा जोशी, प्रवासी

नोकरदार, विद्यार्थ्यांना फटका

  • कल्याण पूर्व, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ भागातून चारचाकी वाहनाने नवी मुंबई, मुंबईकडे शिळफाटा मार्गाने जाणाऱ्या नोकरदारांना शुक्रवारी वाहतूक कोंडीचा फटका बसला.
  • अनेक शाळांमध्ये विद्यार्थी किमान अर्धा तास उशिरा पोहोचल्याचे सांगण्यात आले. ‘बसचालकांनी शाळा व्यवस्थापनांना वाहतूक कोंडीची कल्पना दिली होती. परंतु, तरीही काही शाळांनी मुले उशिरा पोहोचल्याचा त्यांच्या हजेरीपटावर शेरा दिला,’ अशी माहिती शालेय बस वाहतूक संघटनेचे योगेश तांबे यांनी दिली.
  • शिळफाटापासून ते काटई नाकापर्यंत वाहनांचा रांगा लागल्या. अर्धा तासांच्या अवधीनंतर ही वाहने पुढे सरकत असल्याने अनेक वाहन चालकांनी काटई नाका येथे वळण घेऊन बदलापूर रस्ता ते तळोजा मार्गाने नवी मुंबई, मुंबईतील कार्यालये गाठण्याचा प्रयत्न केला. सकाळी साडेआठ वाजता आपल्या वाहनाने निघालेले डोंबिवलीतील नोकरदार वाहतूक कोंडीमुळे साडेदहा वाजले तरी कार्यालयात पोहचले नव्हते.
  • नवी मुंबई, पनवेल भागातील महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी नवी मुंबई, केडीएमटी परिवहनच्या बसने प्रवास करतात. हे सगळे प्रवासी सकाळच्या वाहतूक कोंडीत अडकून पडले.
  • कामगारांना नेण्यासाठी येणाऱ्या कंपन्यांच्या बस महापे, तुर्भे भागात अडकून पडल्या. त्यामुळे कामगारांना ताटकळत राहावे लागले.
  • मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या पायथ्याशी पडलेले खड्डे, मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि त्यात सकाळी शिळ चौकामध्ये बंद पडलेल्या दोन अवजड वाहनांमुळे वाहतूक मार्गात करण्यात आलेले बदल या कारणांमुळे शहरांमध्ये वाहतूक कोंडी झाली. संदीप पालवे, पोलीस उपायुक्त (ठाणे वाहतूक शाखा)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Traffic jam in thane city