सिंहस्थ कुंभमेळय़ासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीने नाशिक गजबजले असले तरी याचा भार काही प्रमाणात ठाणे शहरातील वाहतुकीवरही होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून ठाणे शहराला भेदून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीत २५ टक्क्यांची वाढ झाली असून त्यामुळे ठाण्यातील आनंदनगर ते कापुरबावडी, कळवा पूल, कळवा-खारीगाव टोलनाका या मार्गावर रात्रीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. रात्रीच्या वेळी शहरांतर्गत वाहतूक कमी होत असल्याने याचा परिणाम शहरातील रस्त्यांवर दिसत नसला तरी महामार्ग आणि घोडबंदर मार्गावर मात्र, वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र आहे.
मुंबई-नाशिक महामार्ग हा नेहमीच गजबजलेला असतो. त्यातच मुंबई, ठाणे पट्टय़ातील अनेक कंपन्या, दुकानांची गोदामे भिवंडी, माणकोली, राजणोली या भागात असल्याने रात्रीच्या वेळी या महामार्गावरून अवजड वाहनांची मोठी ये-जा सुरू असते. त्यातच आता कुंभमेळय़ाच्या निमित्ताने नाशिककडे जात असलेल्या भाविकांच्या वाहनांची भर पडली आहे. कुंभमेळय़ाच्या काळात तब्बल पाच लाख जादा वाहने ठाणे शहरातून वाट काढत नाशिक महामार्गाकडे वाहतूक करतील, असा वाहतूक पोलिसांचा अंदाज आहे. कुंभमेळय़ास प्रारंभ झाल्यापासून, गेल्या तीन दिवसांत महामार्गावरील वाहतुकीत २५ टक्क्यांची वाढ झाल्याने हा अंदाज खरा ठरत आहे. महामार्गावरील वाहनांची वर्दळ वाढल्याचा थेट परिणाम ठाणे, कळवा, खारेगाव या पट्टय़ातील अंतर्गत वाहतुकीवरही होत आहे. आनंदनगर ते कापुरबावडी पुढे कासारवडवली, कळवा पूल, गोल्डन डाईज नाका, कळवा-खारीगाव टोलनाका येथे रात्रीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
दैनंदिन वाहतूक आणि कुंभमेळय़ाच्या काळात वाढणारा वाहनांचा भार पेलण्याची क्षमता मुंबई-नाशिक महामार्गाची नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कुंभमेळ्यासाठी रात्री उशिरा नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसू लागले असून यामुळे कापुरबावडी नाक्यावर आणि खारेगाव टोलनाक्यावर लोढा वसाहतीपर्यत वाहनांच्या रांगा लागत आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेच्या उपायुक्त डॉ.रश्मी करंदीकर यांनी दिली. असेच चित्र कासारवडवली, तत्त्वज्ञान विद्यापीठ पट्टय़ातही दिसत आहे.

वाहतूकसेवक नेमणार
शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी जागोजागी वाहतूकसेवक नेमण्याचा विचार सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यांसाठी तब्बल १०० वाहतूकसेवक शहरातील नाक्यानाक्यावर तैनात केले जाणार आहेत. महापालिकेमार्फत नेमण्यात येणाऱ्या या वाहतूकसेवकांना दहा हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. वाहतूक पोलिसांप्रमाणे वाहनचालकांना कोणत्याही प्रकारचा दंड अथवा कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार या सेवकांना नसतील. केवळ वाहतूक नियमनाचे काम या सेवकांना दिले जाईल, अशी माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.