ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रवास टाळण्यासाठी अनेक वाहनचालक कोलशेत येथील अंतर्गत मार्गाचा वापर करू लागल्याने या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे. मात्र, या मार्गावर गेल्या अडीच वर्षांपासून नाले बांधणीचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे वाहतूकीसाठी पुरेशा मार्गिका उपलब्ध होत नसून घोडबंदरच्या पर्यायी अंतर्गत मार्गावरही सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीचा मनस्ताप स्थानिकांना सहन करावा लागत असून ते अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.

नवे ठाणे म्हणून घोडबंदरचा परिसर ओळखला जातो. या भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या भागातील नागरिक कामानिमित्ताने घोडबंदर मुख्य रस्त्याने वाहतूक करतात. परंतु या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यातच या मार्गावर मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या कामांमुळे हा मार्ग अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडीत भर पडत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी अनेक नागरिक आता माजिवडा, कोलशेत, ब्रह्मांड या अंतर्गत मार्गाने आनंदनगर ते कासारवडवलीपर्यंत प्रवास करतात. अनेक दुचाकीस्वार हे सेवा रस्त्याने वाहतूक करायचे. मात्र, सेवा रस्ते आता मुख्य रस्त्यांना जोडले जात आहेत. त्यामुळे सुरक्षित वाहतूकीसाठी अनेकजण कोलशेत भागातून वळसा घालून वाहतूक करतात. यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोलशेत मार्गांवर वाहनांचा भार वाढल्याचे चित्र आहे. असे असतानाच, ४० मीटर रुंद करण्यात आलेल्या रस्त्यावरील कोलशेत भागात नालेबांधणीचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. या कामाच्या परिसरात ४० मीटरपैकी २२ मीटरचा रस्ता वाहतूकीसाठी उपलब्ध आहे. या चिंचोळ्या मार्गाजवळ माजिवाडा किंवा कोलशेत भागातून वाहने येथे येताच त्यांचा वेग मंदावून कोंडी होते. याच परिसरात मोठ्या वसाहती असून त्यांना या कोंडीचा फटका बसत आहे.

काम संथगतीने

कोलशेत भागातील रस्ता ४० मीटर रुंद करण्यात आला आहे. या मार्गावर लोढा वसाहतीच्या परिसरात नालेबांधणीचे काम सुरू आहे. सहा महिन्यात हे काम पुर्ण केले जाणार होते. त्यासाठी डिसेंबर २०२३ ची मुदत होती. मात्र, विद्युत आणि जलवाहिन्या स्थलांतरीत करण्याच्या कामामुळे नालेबांधणी कामास उशीर झाला. त्याला अनेकदा मुदत वाढ देण्यात आली आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिका काय म्हणते?

यंदा जून महिना अखेरीस हे काम पुर्ण केले जाणार होते. मात्र, मे महिन्यातच पाऊस सुरू झाला. त्यामुळे नाले बांधणीसाठी जे बांधकाम करण्यात आले होते. त्यावर मातीचा गाळ जमा झाला. नाल्याचा प्रवाह वळवून हे काम करावे लागत आहे. परंतु पावसामुळे पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे कामात अडथळे येत असून बांधकामावरील दोन वेळा गाळ काढण्यात आला आहे. परंतु पावसामुळे बांधकामावर मातीचा गाळ जमा होत आहे. आता डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पुर्ण केले जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.