ठाणे : घोडबंदर मार्गावरील कासारवडवली भागात रविवारी दुपारी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडीचा सामना वाहन चालक आणि प्रवाशांना सहन करावा लागला. कासारवडवली ते डोंगरीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अवघ्या पाच मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत होता. दरम्यान, घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसने खड्डेभरो आणि भिकमागो आंदोलन केले.
घोडबंदर मार्गावरील कासारवडवली येथील मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होऊ लागला आहे. रविवारी खड्डे आणि पाऊस यामुळे कासारवडवली ते डोंगरीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगल्या होत्या. त्यामुळे ठाणे, भिवंडी येथून घोडबंदर, बोरीवली, वसई-विरार, मिरा भाईंदर, गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल झाले. येथील वाहतुक संथ असल्याने वाहन चालकांना अवघे पाच मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी किमान अर्धा तास लागत होता. घोडबंदर येथील कासारवडवली, आनंदनगर भागात नागरीवस्ती आहे. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांनाही कोंडीचा सामना सहन करावा लागला. गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर भागात मेट्रोची कामे, खड्डे यामुळे वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. रविवारी देखील वाहतुक कोंडी झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसने खड्डेभरो आणि भिकमागो आंदोलन केले.