ठाणे : भिवंडी येथील काल्हेर भागात वाहतुकीचे नियमन करणारे पोलीस हवालदार काशिनाथ राठोड यांच्यासह वाहतुक साहाय्यकांना (वाॅर्डन) मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.काल्हेर भागात शनिवारी सायंकाळी पोलीस हवालदार काशिनाथ राठोड हे वाहतुक साहाय्यक मोहन पाटील आणि विकास पाटील यांच्यासोबत वाहतुकीचे नियमन करत होते. त्याचवेळी मोटारीमधून आलेले तिघेजण मोहन आणि विकास यांच्यासोबत वाहतुकीच्या नियमानावरुन वाद घालू लागले. याबाबतची माहिती त्यांनी राठोड यांना दिली. त्यावेळी राठोड हे तिथे गेले.
राठोड हे त्यांना समजावत असताना त्यांनी पोलिसांचे मोबाईल चित्रीकरण सुरु केले. राठोड यांनीही मोबाईलमधून त्यांचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. ते तिघेही राठोड यांच्यासोबत वाद घालू लागले. त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यापैकी एकाने राठोड यांच्या पोलीस गणवेशाची काॅलर पकडून त्यांच्या डोळ्याखाली हाताने मारले. त्यानंतर त्याचे शर्टवर असलेले नामफलक आणि गणवेश फाडण्यास सुरुवात केली.
वाहतुक साहाय्यकांना देखील त्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. या घटनेची माहिती वाहतुक पोलिसांच्या गस्ती पथकाला मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी आले. त्यांनी तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.