ठाणे : टान्सहार्बर मार्गावर शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास उपनगरीय रेल्वेगाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा परिणाम ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर बसला. बिघाड झालेल्या रेल्वेगाडीतील प्रवाशांना ऐरोली स्थानकात उतरविण्यात आले. त्यानंतर रेल्वेगाडी सानपाडा कारशेडला रवाना झाली. परंतु या प्रकारामुळे उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतुक सुमारे ४० ते ४५ मिनीटे उशीराने सुरु होती. त्यामुळे नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने आणि ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.

ट्रान्सहार्बर मार्गावरून शुक्रवारी रात्री ९.५३ वाजता ठाण्याहून वाशीच्या दिशेने उपनगरीय रेल्वेगाडी सुटते. परंतु या रेल्वेगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तिची वाहतुक सुरळीत होत नव्हती. अखेर ऐरोली रेल्वे स्थानक आल्यानंतर या रेल्वेगाडीतील प्रवाशांना स्थानकात उतरविण्यात आले. तसेच रेल्वेगाडी सानपाडा कारशेडच्या दिशेने रवाना झाली.

सानपाडा येथे पोहचे पर्यंत रेल्वेगाडी अनेकदा बंद पडली. रेल्वेगाडीतील बिघाडाचा परिणाम ट्रान्सहार्बर मार्गावरील इतर रेल्वेवाहतुकीवर बसला. ट्रान्सहार्बर मार्गावर रेल्वेगाड्यांच्या एकापाठोपाठ एक रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रेल्वेगाड्यांची वाहतुक सुमारे ४० ते ४५ मिनीटे उशीराने होत होती. रेल्वे वाहतुक विस्कळीत झाल्याने नोकरदारांना वेळेत घरी पोहचता आले नाही. प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात होती. रात्री ११ नंतरही येथील वाहतुक सुरळीत झाली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला.