लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : मुंब्रा शिळफाटा येथील अवजड वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून वाहतुक शाखेचा वॉर्डन वसूली करत असल्याचे चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर मुंब्रा वाहतुक कक्षाच्या पोलीस निरीक्षकासह ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली मुख्यालयात करण्यात आली आहे. या कारवाईनंतर इतर सर्वच वाहतुक कक्षातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. वाहतुक पोलीस दलात पहिल्यांदा इतक्या मोठ्याप्रमाणात कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.

मुंब्रा शिळफाटा येथे काही दिवसांपूर्वीच शिळफाटा उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. शिळफाटा, मुंब्रा, खारेगाव येथील काही भाग, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, दिवा हा भाग ठाणे वाहतुक नियंत्रण शाखेच्या मुंब्रा वाहतुक कक्षा अंतर्गत येतो. शिळफाटा भागात अवजड वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून वसूली केली जात होती. असे चित्रीकरण येथील एका स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये दोन दिवसांपूर्वी प्रसारित झाले. हे चित्रीकरण सुरू असताना, वसूली करणारा व्यक्ती तेथून पळून गेला.

आणखी वाचा-ठाण्यातील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक; चोरीच्या उद्देशातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

हे चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर याची दखल आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी घेतली. त्यानंतर उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांच्यासह ४० जणांचा सामावेश आहे. या सर्वांची बदली मुख्यालयात करण्यात आली आहे. ठाणे पोलीस दलातील वाहतुक विभागात पहिल्यांदा इतक्या मोठ्याप्रमाणात कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे. मुंब्रा वाहतुक कक्षात आता समाधान चव्हाण यांची तात्पुरती बदली करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transfer of 40 people including police inspector in traffic cell in case of extortion in shilpata mrj
First published on: 18-02-2024 at 11:11 IST