scorecardresearch

ठाणे महापालिकेच्या सार्वजिनिक बांधकाम विभागात मोठे फेरबदल; वर्षोनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या

राजकीय दबावामुळे विविध विभागातील अधिकाऱ्यांसह अभियंते वर्षोनुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे चित्र होते.

ठाणे महापालिकेच्या सार्वजिनिक बांधकाम विभागात मोठे फेरबदल; वर्षोनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या
ठाणे महानगरपालिका

ठाणे : महापालिकेत कामावर उशीरा येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याबरोबरच दर्जात्मक कामावर लक्ष केंद्रीत करत अधिकाऱ्यांसह ठेकेदारांची कान उघडणी करणाऱ्या ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सार्वजिनिक बांधकाम विभागात मोठे फेरबदल केले आहेत. त्यामध्ये वर्षोनुवर्षे प्रभाग समित्या आणि पालिका मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून या बदल्यांचे आदेश नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी मंगळवारी काढत संबंधित अभियंत्यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>> ठाणे : म्हसा यात्रेनिमित्त अवजड वाहनाच्या वाहतुकीत बदल; मुरबाड-कर्जत मार्गावर अवजड वाहनाच्या वाहतुकीत बदल

ठाणे महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक अभियंते वर्षोनुवर्षे पालिका मुख्यालय आणि प्रभाग समित्यांमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. या अभियंत्यांच्या बदलीबाबत कोणतीही भुमिका प्रशासनाकडून घेताना दिसून येत नव्हती. तसेच यापुर्वी इतर विभागातील करण्यात आलेल्या बदल्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव वापरून रोखल्या होत्या. यामुळे प्रशासनाची नाचक्की झाल्याचे दिसून आले होते. राजकीय दबावामुळे विविध विभागातील अधिकाऱ्यांसह अभियंते वर्षोनुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे चित्र होते. असे असतानाच, काही महिन्यांपुर्वीच पालिकेची सुत्रे हाती घेणारे आयुक्त अभिजीत बांगर यांनी आता अशा अधिकाऱ्यांसह अभियंत्यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सार्वजिनिक बांधकाम विभागात मोठे फेरबदल केले आहेत.

हेही वाचा >>> ठाणे: एखादी दुर्घटना घडली तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार; महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा

पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात मुंब्रा प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांची पालिका मुख्यालयात बदली केली आहे. गोसावी हे गेले अनेक वर्षे मुंब्रा प्रभाग समितीत ठाण मांडून बसलेले होते. त्यांच्या जागी मुख्यालयातील कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे बी एस यु पी या विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. मुख्यालयातील कार्यकारी अभियंता भगवान शिंदे यांची वागळे प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंता पदी बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे मुख्यालयाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. मुख्यालयातील कार्यकारी अभियंता महेश अमृतकर यांची लोकमान्य सावरकर प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंता पदी बदली करण्यात आली असून त्यांच्याकडेही मुख्यालयाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता महेश बहिरम यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे तर वागळेप्रभाग समितीचे विलास धुमाळ यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 17:51 IST

संबंधित बातम्या