ठाणे पोलीस दलातील विसंवाद टोकाला? ; बदल्या रखडल्या, अनेक पदे रिक्त; वाहतूक नियंत्रणातही बदल्यांची कोंडी

राज्यभरातून ठाणे पोलीस दलात बदलीने आलेले वरिष्ठ अधिकारी नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : ठाणे पोलीस दलात गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर विसंवाद सुरू असल्याची चर्चा असून आयुक्तालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वाद टोकाला पोहोचल्याने बदल्या, नियुक्त्या रखडल्या असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

ठाण्यात होणारी वाहनकोंडी सोडवताना वाहतूक पोलीस दल मेटाकुटीला आले आहे, तसेच गुन्हय़ांचा आलेखही वाढत आहे. असे असतानाही वाहतूक शाखेतील साहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे अन्वेषण शाखेतील महत्त्वाची पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असून राज्यभरातून ठाणे पोलीस दलात बदलीने आलेले वरिष्ठ अधिकारी नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग आणि सहआयुक्त डॉ. सुरेश मेकला यांच्यातील विसंवादाच्या अनेक कहाण्या गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलात चर्चिल्या जात असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपुढेच या विसंवादाचे अनेक नमुने अनेकदा पाहायला मिळाल्याचे बोलले जात आहे. मुंबई आणि आसपासच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची ठाणे शहर पोलीस दलात बदली झाली आहे. नव्याने शहरात दाखल झालेल्या या पोलीस अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्त्या मिळणे अपेक्षित आहे. पोलीस दलातील काही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. वाहतूक शाखेतील साहाय्यक पोलीस आयुक्त तसेच गुन्हे अन्वेषण विभागातील काही पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. याशिवाय आयुक्तालयातील काही महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची मुदत संपली असून तेथेही नव्या नियुक्त्या होणे अपेक्षित आहे. असे असताना पोलीस आयुक्त आणि सह-पोलीस आयुक्तांमध्ये एकवाक्यता नसल्याने ही संपूर्ण प्रक्रिया रखडल्याची चर्चा आहे. बदलीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक कर्मचारी नियंत्रण कक्षातच बसून आहेत. याचा परिणाम वाहतूक नियंत्रण आणि गुन्हे आलेखावर होऊ लागल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांबद्दल सहआयुक्त डॉ. सुरेश मेकला यांच्याशी संपर्क साधला असता ‘सीपी कौन है, उनसे जाके पूछो..’ असे म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. जयजीत सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाली नाही. लघुसंदेश पाठवला असता, त्यांच्याकडून दुपारी उशिरापर्यंत उत्तर मिळाले नाही.

रिक्त जागांचे दुखणे कायम

ठाणे वाहतूक नियंत्रण कक्षात ठाणे, भिवंडी आणि उल्हासनगर येथील साहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या जागा रिक्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये होणारी वाहनकोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. अशा परिस्थितीत या विभागाच्या जागा रिक्त आहेत. कापूरबावडी, उल्हासनगर यांसारख्या महत्त्वाच्या वाहतूक कक्षात अद्याप पोलीस निरीक्षकांची नेमणूक झालेली नाही. कासारवडवली, नारपोली यांसारख्या मोक्याच्या पोलीस ठाण्यांमध्ये नव्या पोलीस निरीक्षकाची नियुक्ती झालेली नाही. त्याशिवाय शहरातील गुन्हेगारीचा आलेख गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे पोलीस दलामधील कर्मचाऱ्यांमध्ये चिंता सातवत आहे. हे सर्व प्रकार घडत असताना पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास कोणतीही हालचाल करताना दिसत नाहीत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधील विसंवादामुळेच या बदल्या, नियुक्त्या रखडल्याचे उघडपणे पोलीस दलात बोलले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Transfers and appointments stuck due to dispute in two senior officers in thane commissionerate zws

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या