ठाणे : ठाणे पोलीस दलात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या बदल्या होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी राज्य शासनाने ठाणे पोलीस दलातील तीन अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या राज्यात इतरत्र बदल्या केल्या आहेत. त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे आणि आर. एल. पोकळे यांची नियुक्ती केली आहे. एका जागेवर मात्र अद्यापही नियुक्ती केली नसून त्या जागेसाठी पोलीस दलात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. सोमवारी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांचा आदेश काढला. त्यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयातील पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ए. डी. कुंभारे यांची नागपूर येथे राज्य राखीव दलाच्या उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आर. एल. पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय ऐनपुरे यांची पुणे येथील बिनतारी संदेश उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. या रिक्त पदावर पुणे शहर गुन्हे अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोराळे यांनी यापूर्वी ठाणे पोलीस दलात परिमंडळ एकचे उपायुक्त म्हणून काम केले आहे. पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांची नियुक्ती सोलापूरच्या आयुक्तपदी झाली आहे.

रिक्त जागेवर कुणाची वर्णी?

ठाणे पोलिसांच्या पूर्व प्रादेशिक विभागामध्ये कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ ही शहरे येतात. मोठी लोकवस्ती असलेला हा विभाग पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या क्षेत्राचा कार्यभार अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांच्याकडे होता. मात्र, त्यांची सोलापूर आयुक्तपदी बदली झाल्याने ही जागा आता रिक्त झाली आहे. या ठिकाणी कोणाचीही वर्णी लागलेली नाही. या रिक्त जागेवर वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुक वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे.