ठाणे महापालिका प्रभाग समिती साहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. शहरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवरून टीका होऊ लागल्याने पालिका प्रशासनाने या बदल्या केल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी साहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्यानंतरही बेकायदा बांधकामे थांबलेली नव्हती. मग, आता पुन्हा करण्यात आलेल्या बदल्यानंतर बांधकामे थांबतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शहराच्या विविध भागात विकासकामांचे पाहाणी दौरे सुरु आहेत. असे असतानाच ठाणे, कोपरी, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात बेकायदा बांधकामे सुरु असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आयुक्त शर्मा यांना हि बांधकामे निदर्शनास येत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच शहरात बेकायदा बांधकामांचे पुन्हा पेव फुटल्याने पालिका अतिक्रमण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

शहरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवरून टीका सुरू असतानाच पालिका प्रशासनाने साहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. वर्तकनगर प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची वागळे प्रभाग समितीत बदली करण्यात आली असून याशिवाय त्यांच्याकडे परवाना विभाग, क्लस्टर सेलचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तर, कळवा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त समीर जाधव यांची वर्तकनगर प्रभाग समितीत बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे निवडणुक विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेत बदली झालेले साहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना कळवा प्रभाग समिती देण्यात आली आहे. या साहाय्यक आयुक्तांनी अतिरिक्त पदभारासह सोपविण्यात आलेल्या विभागांचा कार्यभार तात्काळ स्विकारुन अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिले आहेत.
कळवा परिसरातील बेकायदा बांधकामांसंदर्भात अहवाल मागितला म्हणून साहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हे समीर जाधव यांनी फेटाळून लावत आहेर यांना प्रतिउत्तर दिले होते. यानिमित्ताने महापालिकेतील स्थानिक विरुद्ध शासनाकडून आलेले अधिकारी या दोन गटातील अधिकाऱ्यांमधील मतभेद चव्हाटय़ावर आले होते. त्यातच जाधव यांची अंतर्गत बदली झाल्याने त्यांना बेकायदा बांधकामाचे प्रकरण भोवल्याचे चर्चा सुरू झाली आहे.