ठाणे – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण, तक्रारींचे जलद निवारण आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी विशेष विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार, १५ एप्रिल रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार आहे.
राज्यातील तृतीयपंथीय समुदायाला भेडसावणाऱ्या विविध सामाजिक, कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजातील मुख्य प्रवाहात तृतीयपंथीयांचा सन्मानाने समावेश व्हावा, त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता वाढावी आणि शासनाच्या योजनांचा त्यांना प्रभावी लाभ मिळावा, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. या कार्यशाळेचे आयोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढाकारातून करण्यात आले असून, प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण, मुंबई विभाग) आणि सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण, ठाणे) यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम साकारत आहे. तसेच समाज कल्याण विभाग, मुंबई व ठाणे आणि विभागीय तृतीयपंथी मंडळ, कोकण विभाग यांच्या सहकार्याने हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविला जात आहे.
शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक विभाग आणि जिल्ह्यात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या कार्यपद्धती अधिक सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक कशा बनवता येतील, यावर या कार्यशाळेत सखोल चर्चा केली जाणार आहे. तक्रारींची नोंदणी, त्यांचे परीक्षण, संबंधित विभागांशी समन्वय आणि तातडीने निवारण यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
कार्यशाळेदरम्यान तृतीयपंथीयांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. त्यात ओळख, सन्मान, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा यांसंबंधित हक्कांची माहिती दिली जाईल. तसेच विविध शासकीय योजना, आर्थिक सहाय्य, स्वयंरोजगार संधी आणि कौशल्य विकास कार्यक्रमांचा लाभ कसा घ्यावा, याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषतः, तृतीयपंथीयांसाठी अधिकृत ओळखपत्र (ID) मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज पद्धती आणि त्यातील अडचणी यांचे निराकरण यावर स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
ही कार्यशाळा संवादात्मक स्वरूपाची असणार असून सहभागी तृतीयपंथीयांना त्यांच्या समस्या, अनुभव आणि अपेक्षा थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. संबंधित अधिकारी आणि तज्ज्ञांकडून त्या समस्यांवर तत्काळ मार्गदर्शन दिले जाईल. त्यामुळे ही कार्यशाळा केवळ माहितीपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या एकदिवसीय कार्यशाळेत केवळ मार्गदर्शनच नाही, तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण, ठाणे) समाधान इंगळे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत समाज कल्याण विभाग, मुंबई व ठाणे आणि विभागीय तृतीयपंथी मंडळ, कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
