वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक विभागानं दणका दिला आहे. गेल्या दोन महिन्यात बेशिस्त वाहनचालकांना ई चलानद्वारे दंड पाठवण्यात आला होता. पण दंडात्मक रक्कम वाहन मालकांकडून वाहतूक विभागाकडे भरली जात नव्हती. वारंवार समज देऊनही या रकमा भरल्या जात नव्हत्या. त्यामुळे डोंबिवली, कल्याण, कोळसेवाडी वाहतूक विभागात अस्वस्थता होती. त्यानंतर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये थकबाकीदार वाहन मालकांना हजर राहण्याचे आदेश देऊन वाहतूक विभागाने ७ हजार १६१ वाहन मालकांकडून ३४ लाख ५३ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे, याबाबतची माहिती कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

डोंबिवली, कोळसेवाडी आणि कल्याण वाहतूक विभागातील ही वाहतूक नियमभंगाची प्रकरणं आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते, चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यापासून कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी बेशिस्त वाहन चालकांवर नियमित कारवाई सुरू केली आहे.

दर्शक यंत्रणा, चौकातील सीमा पट्टीचे उल्लंघन करणं, शिरस्त्राण न घालणे, वेगाने वाहन चालविणे अशा बेशिस्त दुचाकी, चारचाकी वाहन चालकांवर वाहतूक पोलीस नियमित कारवाई करत आहेत. एप्रिल ते ७ मे या कालवाधीत तिन्ही वाहतूक शाखा हद्दीत सात हजार वाहन चालकांनी नियमभंग करून त्यांना ई चलानद्वारे दंड पाठविण्यात आला होता. ही दंडाची रक्कम ३४ लाख ५० हजार रूपये इतकी आहे. वाहतूक विभागाने अशा वाहन चालक, मालकांना वारंवार नोटीसा बजावूनही ही रक्कम मालक भरणा करत नव्हते. ही सर्व प्रकरणे तालुका विधी सेवा समितीच्या लोक अदालतीसमोर डोंबिवली, कल्याण, कोळसेवाडी वाहतूक विभागाकडून सुनावणीसाठी ठेवण्यात आली.

कल्याण वाहतूक विभागात दोन हजार ५२८ प्रकरणांमध्ये वाहन मालकांकडून १२ लाख ५४ हजार रूपयांचा दंड, कोळसेवाडी वाहतूक विभागाने दोन हजार ३६ प्रकरणांमध्ये नऊ लाख ८८ हजार रूपयांचा दंड, डोंबिवली वाहतूक विभागाने दोन हजार ५९७ प्रकरणांमध्ये १२ लाख नऊ हजार रूपयांचा दंड लोक अदालतीच्या माध्यमातून वसूल केला, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक तरडे यांनी दिली.

वाहतूक नियम भंग केला तर दंडाच्या रकमा नवीन कायद्याने वाढविण्यात आल्या आहेत. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे वाहतुकीवर नियंत्रण ठेऊन आहेत. तरीही वाहन चालक बेशिस्तपणे वाहन चालवित आहेत. अशा बेशिस्त वाहन चालक, मालकांवरील कारवाई अधिक कठोर करण्याचा विचार वाहतूक अधिकारी करत आहेत. सातत्याने वाहतूक नियम भंग केल्यास अशा वाहन मालकाचा परवाना उपप्रादेशिक विभागाकडून काही महिन्यांसाठी निलंबित करता येतो. या नियमांचा वाहतूक पोलीस अधिकारी अवलंब करणार आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.