ठाणे : ठाणेकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारी विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत, यासाठी कामांचे कालबद्ध नियोजन करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. ठाणे जिल्ह्यातील मेट्रो, घोडबंदर प्रकल्पांसह इतर महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी आढावा घेतला. यावेळी ठाणे शहरातील मेट्रो आराखडा आणि रस्ते विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह मेट्रो प्राधिकरण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, वन विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ तसेच विविध संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रस्तावित मेट्रो मार्गिकेच्या आराखड्यांमुळे परिसरातील संरचनांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे तांत्रिक सर्वेक्षण करूनच अंतिम निर्णय घेण्यात यावा, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. संबंधित भागात सर्व यंत्रणांची संयुक्त पाहणी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पारदर्शक पद्धतीने प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची सूचना त्यांनी केली.
याशिवाय घोडबंदर मार्गावरील रस्ते विकासकामांदरम्यान भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान, हिरानंदानी परिसरातील प्रलंबित संरक्षण भिंतीचे काम, वाघबीळ येथील प्रस्तावित शूटिंग रेंज प्रकल्पासाठी सुमारे २६ ते २७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी आवश्यक अंदाजपत्रक व शासन मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे काम, तसेच अन्य प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण करण्यात यावीत, असे सरनाईक यांनी सांगितले. महापालिकेच्या यापुढील नव्या प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी वनस्पती उद्यानाच्या विकासासाठी तज्ज्ञांमार्फत आराखडा तयार करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
क्रीडा सुविधांच्या कामांना गती देण्याचे आदेश
शहरातील फुटबॉल टर्फ, पिकलबॉल कोर्ट आणि जलतरण तलाव यांसारख्या क्रीडा सुविधांची तसेच, फुटबॉल टर्फ आणि जलतरण तलाव दिवाळीपूर्वी नागरिकांसाठी खुले करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया, कार्यादेश आणि हस्तांतरणाची कार्यवाही कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना सरनाईक यांनी दिले. विकासकामांमध्ये न्यायालयीन अथवा प्रशासकीय अडथळे असल्यास आवश्यक कायदेशीर कार्यवाही गतीने पूर्ण करून ते दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पॉड टॅक्सी प्रकल्पाबाबत अंतिम आराखडा करण्याच्या सूचना
प्रस्तावित पॉड टॅक्सी प्रकल्पाबाबत आवश्यक तांत्रिक मानके, व्यवहार्यता अहवाल, सामाजिक परिणामांचा अभ्यास आणि प्रस्तावित वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून अंतिम आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. स्वतंत्र तांत्रिक सल्लागार संस्थेमार्फत व्यवहार्यता अहवालाचे पुनर्मूल्यांकन करून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
