कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाची लवकरच तपासणी मोहीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका ह्दीतील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूक काही खासगी बस चालक करत आहेत. या बस मालकांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे कोणत्याही प्रकारची नोंदणी केली नसल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या या खासगी बस चालकांविरुध्द उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कल्याण विभागातर्फे तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या कारवाईत जे खासगी बस मालक दोषी आढळतील. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ४०० हून अधिक शाळा आहेत. १०० हून अधिक शाळांच्या विद्यार्थी वाहतुकीसाठी खासगी बस आहेत. काही शाळा खासगी बस वाहतूक कंपनीशी करार करुन विद्यार्थी वाहतूक करून घेतात. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व बस मालकांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तशा आशयाची नोंदणी करणे आवश्यक असते. ही नोंदणी करताना शुल्क, अधिभार आणि बसचे दरवर्षी नुतनीकरण करणे आवश्यक असते. हा सर्व व्यवहार टाळण्यासाठी अनेक बस मालक उपप्रादेशिक परिवहन विभागाला अंधारात ठेऊन, या विभागाकडे नोंदणी न करता, शुल्क टाळण्यासाठी चोरुन लपून विद्यार्थ्यांची बस मधून वाहतूक करतात. हे बस मालक पालकांकडून इतर शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या नोंदणीकृत बसच्या तुलनेत कमी भाडे पालकांकडून घेतात. या कमी भाड्याचा विचार करुन पालक या बसकडे आकर्षित होतात, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> ‘महारेरा’ कडून तीन दिवसात मिळणाऱ्या ‘रेरा’ नोंदणीसाठी आता तीन महिन्यांची प्रतीक्षा?

आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची कोणत्या बस मधून वाहतूक केली जाते. यावर शाळा चालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक असते. अनेक शाळा चालकांना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची नोंदणीकृत नसलेल्या बस मधून वाहतूक होते हे माहिती असुनही वादाचे प्रसंग टाळण्यासाठी संबंधित बस मालका विरुध्द वाहतूक विभाग, परिवहन विभागाकडे तक्रार करत नाहीत. अशाप्रकारे नियमबाह्य बसमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी पालक, शाळा, अधिकाऱ्यांवर येते. खासगी बस मधून आसनक्षमतेच्या बाहेर जाऊन विद्यार्थी बस मध्ये कोंबले जातात, असे अनेक पालकांनी सांगितले.

हेही वाचा >>> सामाजिक बदलांचा लेखकांवर रेटा; डोंबिवलीतील युवा नाट्य संमेलन परिसंवादात ज्येष्ठ नाटककार शेखर ढवळीकर यांनी व्यक्त केले मत

मागील काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीतील शाळांची अचानक भर रस्त्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी केली जात नाही. खासगी बस चालकांची मौज सुरू आहे, असे काही नोंदणीकृत बस चालकांच्या मालकांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचे नियमित नुतनीकरण, आवश्यक नोंदणीकरण करुन घ्यावे म्हणून आम्ही नियमित शाळा चालकांना आवाहन करतो. शाळे बाहेरुन नियमबाह्य बस, लहान वाहनांमधून विद्यार्थी वाहतूक होत असेल तर त्याच्या तक्रारी करण्यास सांगतो. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने खासगी बससारखे गैरप्रकार वाढतात.

“कल्याण डोंबिवली शहरांमधील काही शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदणीकृत नसलेल्या खासगी बसमधून वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. लवकरच दोन्ही शहरांमधील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस, खासगी वाहनांची अचानक तपासणी सुरू केली जाणार आहे.”

-विनोद साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transportation of students kalyan dombivli private bus without license thane kalyan news ysh
First published on: 28-11-2022 at 12:46 IST