ठाणे : ई-चलन प्रणालीविरोधात ५ मार्चपासून संपावर जाण्याचा निर्णय वाहतूकदार संघटनांनी घेतला असून यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट्स ॲक्शन कमिटी स्थापन केली आहे. या संपाआधी सरकारला जाग आणण्यासाठी वाहतूकदार संघटनेकडून आज, बुधवारी दुपारी ४ वाजता अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.
“एक मिनिट हॉर्न वाजवा… सरकारला जागे करा… ” अशा स्वरुपाचे हे आंदोलन असणार आहे. त्यासाठी जिथे असाल तिथे, आपल्या गाडीचा हॉर्न सतत ”१” मिनिटे वाजवून या अन्यायकारक प्रणालीचा निषेध करा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी वाहतूकदारांना केले आहे.
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक जीवनावश्यक वस्तुची वाहतूक करणारे कंटेनंर बंदरात अडकून पडले असतानाच, महाराष्ट्रातील वाहतूकदार संघटनांना ई-चलन प्रणालीविरोधात ५ मार्चपासून संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. या संपामुळे राज्यातील व्यापार केंद्रावर त्याचा दुहेरी परिणाम होईल. याशिवाय, जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होऊन महागाई वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
परिवहन विभागाकडूनही संप मागे घेण्यासाठी वाहतूकदारांची समजुत काढण्याचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्त, पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक आयोजित केली आहे. त्याचबरोबर वाहतूकदारांनी आंदोलन स्थगित करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सर्व संघटनांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट्स ॲक्शन कमिटी स्थापन केली असून या समितीच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ई-चलन प्रणालीविरोधात ५ मार्चपासून संपावर जाण्याचा निर्णयावर ठाम असल्याचे सांगत त्यादिवशी मुंबई आझाद मैदानात सर्व वाहतूकदार वाहने नेऊन ती शासनाच्या ताब्यात देण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही शासनाला जाग आली नाहीतर, ५ मार्चपासून संपावर जाणार आहोत, असे पदाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले. या आंदोलनापुर्वी सरकारला जाग आणण्यासाठी “एक मिनिट हॉर्न वाजवा… सरकारला जागे करा… ” असे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.
ऑनलाईन दंडाच्या नावाखाली होणाऱ्या लुटीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी ४ मार्च रोजी संध्याकाळी ४:०० वाजता जिथे असाल तिथे, आपल्या गाडीचा हॉर्न सतत ”१” मिनिटे वाजवून या अन्यायकारक प्रणालीचा निषेध करा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मिनिटांचा त्याग अन्यायाला चपराक, वाहनधारकांची लूट थांबवा… सामान्य जनतेला न्याय द्या, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
