खड्डे, वाहतूक बदल, समन्वयाचा अभाव यांमुळे ठाण्यात वाहतूक कोंडी; घोडबंदर भागात मेट्रोच्या कामांचा फटका

ठाणे : मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर पडलेला खड्डा बुजविण्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर आणि आसपासच्या परिसरात अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असताना घोडबंदर मार्गावर मेट्रोचे खांब उभारण्याच्या कामासाठी या भागात मोठे वाहतूक बदल हाती घेण्यात आल्याने ठाणेकर पुन्हा वेठीस धरले जाणार आहेत. मेट्रोचे खांब उभारण्यासाठी ४ ते ९ ऑगस्ट दरम्यान घोडबंदर येथील आनंदनगर ते कासारवडवली दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाने सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने रात्रीच्या वेळेत पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणे प्रवाशांना नकोसा होईल, अशी भीती आहे. मुंब्रा बाह्य़वळणाचे काम पूर्ण झाले नसताना घोडबंदर मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे खांब उभारण्याची घाई का, असा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकर विचारत आहेत.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर मोठा खड्डा पडल्याने ठाणे वाहतूक शाखेने गुरुवारपासून या मार्गावरील ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतुकीस शिळफाटा येथे प्रवेश बंद केला आहे. येथील वाहतूक महापे, कोपरखैरणे पुलाखालून, रबाळे, ऐरोली, आनंदनगर, कोपरी रेल्वे पूलमार्गे ठाण्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असले तरी मुलुंड येथे टोलनाका असल्याने टोल वाचविण्यासाठी काही ट्रक आणि टेम्पोचालकांनी पटणी येथे प्रवेश करून कळवा, विटावा मार्गे ठाण्यातून घोडबंदरच्या किंवा खारेगावच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. त्याचा परिणाम कळवा, विटावा तसेच शहरातील अंतर्गत मार्गावरही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. तसेच कोपरी पुलावरून तीन हात नाका, नितीन कंपनी मार्गे घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा भार या मार्गावर आलेला आहे. त्यामुळे कोपरी ते तीन हात नाक्यापर्यंत वाहतूक कोंडीचे चित्र असते. त्यातच बुधवारपासून घोडबंदर मार्गावरही एमएमआरडीएने मेट्रोचे खांब निर्माणाचे काम हाती घेतले आहे. हे काम मध्यरात्री केले जाणार आहे. त्यामुळे ४ ते ९ ऑगस्ट या दिवसांत रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत घोडबंदरच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक कापूरबावडीहून भिवंडीतील कशेळी-काल्हेर किंवा माजीवडा येथून खारेगाव टोलनाका मार्गे वळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम या दोन्ही मार्गावर होण्याची शक्यता आहे.

या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावणार आहे. मुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद असल्याने गुजरातच्या दिशेने जाणारे कंटेनर हे कोपरी मार्गे येत आहेत. कोपरी पुलाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. तसेच तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन येथे मेट्रोचे काम सुरू असल्याने मार्गरोधक बसविल्याने अर्धा रस्ता या मार्गरोधकांनी व्यापला आहे. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे कोपरी ते कॅडबरी जंक्शन भागातही वाहतुकीचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सर्वसामान्य वाहन चालक प्रशासनाच्या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढले आहेत. सर्वसामान्यांना रेल्वे प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे अनेक जण त्यांची वाहने घेऊन मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने कामाला जात असतात. खड्डय़ांमधून मार्ग काढत असताना ठाण्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करत आहे.

वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ

ठाणे शहरात अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खारेगाव, साकेत या भागांत राज्य रस्ते विकास महामंडळाने वारंवार खड्डे बुजवूनही या ठिकाणी खड्डे पडत आहेत. त्यातच मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक बंद आणि घोडबंदरमध्ये मेट्रोची कामे यांमुळे वाहतूक पोलिसांनाही वाहतूक कोंडी सोडविताना नाकीनऊ आले आहेत.

खड्डा बुजवण्यास आणखी अवधी

मुंब्रा बाह्य़वळणाचा खड्डा बुझविण्याचे काम बुधवारी पूर्ण केले जाणार होते. मात्र त्यास आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे वाहनचालकांना आणखी दोन ते तीन दिवस अवजड वाहनांच्या कोंडीत अडकावे लागण्याची शक्यता आहे.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाबाबतची निश्चित तारीख सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते देत नाहीत. त्यामुळे वारंवार अधिसूचना काढण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. खारेगाव टोलनाका येथेही दोनवेळा खड्डे बुजविण्यात आले. मात्र पावसात पुन्हा त्या ठिकाणी खड्डे पडतात. त्यामुळे ठाणे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.