ठाणे : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या प्रकल्पाच्या कास्टींग यार्डकरीता सुमारे १ हजार किलोलिटर प्रतिदिन इतके पाणी लागणार असून त्यासाठी कोलशेत आणि नागलाबंदर येथील मलप्रक्रिया केंद्रात प्रक्रीया केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यानुसार घरगुती वापराच्या निम्म्या दराने म्हणजेच १ हजार लीटरसाठी ३ रुपये ७५ पैसे इतका दर आकरला जाणार आहे. यापुर्वी हे पाणी खाडीत सोडले जात होते. मात्र, त्यातून आता पालिकेला काहीसे उत्पन्न मिळणार आहे.
ठाणे आणि बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्प उभारणीचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मे. मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमार्फत हे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ठाण्यातील मानपाडा भागातील निळकंठ वुड्स या वसाहतीशेजारी कास्टींग यार्डची उभारणी केली आहे. या कास्टींग यार्ड करिता सुमारे ७०० किलोलीटर प्रतिदिन आणि बोरीवडे मैदान येथील कास्टींग यार्डकरीता ३०० किलोलीटर प्रतिदिन इतके पाणी लागणार आहे. या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी संबंधित ठेकेदाराने ठाणे महापालिका प्रशासनाकडे केली होती. हि मागणी मान्य करत पालिकेने मलप्रक्रीया केंद्रातील पाणी देण्याची तयारी दाखविली होती.
यानंतर ठेकेदाराने कोलशेत आणि नागला बंदर येथील मलप्रक्रिया केंद्राची पाहाणी करून तेथील पाण्याचे नमुने गुणवत्ता तपासणीसाठी घेतले होते. त्यात हे पाण्याची गुणवत्ता चांगली असल्याचे समोर आल्यानंतर ठेकेदाराने हे पाणी देण्याची मागणी केली. यानंतर पालिकेने कोलशेत आणि नागला बंदर येथील मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रीया केलेले पाणी ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
घरगुती वापरापेक्षा निम्मे दर
ठाणे महापालिकेच्या कोलशेत मलप्रक्रीया केंद्रात १० दशलक्षलीटर तर, नागलाबंदर मलप्रक्रीया केंद्रात ४ दशलक्षलीटर मैलापाण्यावर प्रक्रीया करण्यात येते. या केंद्रातून प्रक्रीया करण्यात आलेल्या पाण्याच्या विक्रीसाठी यापुर्वी दर ठरविण्यात आलेले नव्हते. तसेच हे पाणी खाडी सोडण्यात येत आहे. ठाणे महापालिकेने मंजुर केलेले पाण्याचे दर घरगुती वापराचे आहेत. त्यामुळे घरगुती पाणी वापरासाठी नागरिकांना देत असलेल्या पाण्याच्या मुळ दरापेक्षा निम्म्या दराने पाणी देण्याबाबत पालिका आणि ठेकेदार यांच्यात झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. यानुसार पालिके हा निर्णय घेतला आहे.
कोलशेत आणि नागलाबंदर मलप्रक्रीया केंद्रातील प्रक्रीया केलेले पाणी उचलण्याची पुर्ण व्यवस्था मे. मेघा इंजीनियरींग कंपनीला स्व: खर्चाने करावी लागणार असून त्यात साठवणुक टाकी, पाणी वाहून नेण्याकरीता जलवाहीनी, पाणी उपसा करणारी यंत्रणा आणि कास्टींग यार्डमध्ये पाणी साठवण्यासाठी टाकी, अशा कामांचा समावेश आहे.