ठाण्यात झाड पडून वकिलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन झाडे पडल्याची दुर्घटना सोमवारी घडली. यात सहा वाहनांचे नुकसान झाले असून, चौघे जण किरकोळ जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

ठाण्यातील नौपाडा राम मारूती रोडवरील राजमाता वडापाव दुकानाजवळ भले मोठे आंब्याचे झाड पडले. यात एका रिक्षासह चार दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. या दुर्घटनेत रिक्षाचालक रजीत यादव (वय ३३) हे किरकोळ जखमी झाले. तर रिक्षातील प्रवाशी सुदैवाने बचावले. याच ठिकाणी दुचाकीवरील राजेश मुदावणे (वय ३६) आणि अंकुश जांभळे याच्यासह एक अज्ञात व्यक्ती असे चौघेजण किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राम मारुती रोडवर भूमिगत केबल रस्त्याच्या खालून गेल्याने झाडांची मुळे कमकुवत झाली असल्याने ती उन्मळून पडण्याच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

दुपारच्या सुमारास ठाण्यातील तलावपाळी येथील दीपक सोसायटी नजीक भलामोठा वृक्ष उन्मळून कारवर कोसळल्याने कारचे नुकसान झाले, अशी माहिती ठाणे महापलिकेच्या आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली. या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.