घरातली खोली सजवण्यासाठी अनेक वस्तूंचा उपयोग आपण करतो. उदा. पडदे, भिंतीवरील फ्रेम्स, साजेसे फर्निचर, साजेशा सुंदर वस्तू इ. या यादीत झाडाची कुंडी किंवा कुंडीतले झाड ही एक अशी बाब आहे की जी कोणत्याही खोलीत शोभून दिसते. दिवाणखान्यातला एखादा कोपरा किंवा घरातली एखादी निवडक जागा आपण कुंडीतल्या झाडाने सजवू शकतो. थोडक्यात, एखाद्या कोपऱ्यात किंवा निवडक जागी कायम झाड दिसण्यासाठी थोडी आखणी म्हणजेच प्लॅनिंग करावे लागते.

घरात एका निवडक ठिकाणी कायम झाड दिसायला हवे असेल तर त्यासाठी तीन कुंडय़ांचा संच असावा. तिन्ही कुंडय़ांमध्ये शोभेच्या झाडांची निवड करावी. उदा. अ‍ॅग्लोनिमा, सर्पपर्णी, ड्रेसेना, क्रोटन, मनिप्लँट, मरांटा इ.

तिन्ही कुंडय़ा आपल्या टेरेसमध्ये, बाल्कनीमध्ये किंवा ग्रिलमध्ये आहेत तसेच घरातल्या खोलीत जिथे कुंडी ठेवायची तिथे ऊन येत नाही असे गृहीत धरले आहे. या कुंडय़ांना आपण सोईसाठी एक, दोन, तीन असे नंबर देऊ या. आता कुंडी क्र. १ सजावटीसाठी खोलीत ठेवली तर उरलेल्या दोन कुंडय़ा बाहेर राहतील. १०-१५ दिवसांनी कुंडी क्र.१ बदलून त्या ठिकाणी कुंडी क्र. २ ठेवावी. कुंडी क्र. १ उचलून भरपूर उजेडाच्या ठिकाणी ठेवावी. मात्र त्यावर थेट ऊन पडू देऊ नये. आता १०-१५ दिवसांनी कुंडी क्र.२ बदलायच्या वेळी कुंडी क्र. ३ घरात ठेवावी. कुंडी क्र. १ उजेडातून उचलून ऊन येईल अशा ठिकाणी ठेवावी आणि कुंडी क्र. २ उजेडात ठेवावी. थोडक्यात, घरातून उजेडात, उजेडातून उन्हाच्या ठिकाणी आणि उन्हातून घरात अशा प्रकारे आपण या कुंडय़ा फिरवाव्यात. यामुळे सर्व तिन्ही झाडांची तब्येत चांगली राहते.

अशी आखणी करण्याचे कारण म्हणजे खोलीतल्या झाडाला ऊन मिळत नाही तसेच उजेड पण कमी मिळतो. त्यामुळे खूप दिवस जर ते झाड त्याच ठिकाणी ठेवले तर त्याची तब्येत खालावेल. तसेच घरातून हलवलेले झाड जर एकदम उन्हात ठेवले तर ते ऊन त्याला सहन होणार नाही आणि त्याची पाने करपतील. त्यामुळे टप्प्याटप्प्याने घरातल्या झाडाला, घरातून उजेडात आणि उजेडातून उन्हात न्यावे. मात्र उन्हातले झाड एकदम घरात ठेवायला हरकत नाही. घरात झाड ठेवण्याच्या ठिकाणीच जर तासभर तरी ऊन येत असेल तर अशा आखणीची गरज नाही. फक्त झाडात बदल दिसावा म्हणून एक महिन्याने पहिली कुंडी हलवून दुसऱ्या शोभेच्या झाडाची कुंडी त्या ठिकाणी ठेवावी.

तीन कुंडय़ांच्या संचामध्ये तीन वेगवेगळी झाडे निवडली तर प्रत्येक वेळी आपल्याला कोपऱ्यात वेगळे झाड बघायला मिळेल. झाड जेव्हा घरात असते, तेव्हा त्याला पाणी कमी लागते. कुंडीखाली जर ताटली (डिश) ठेवली असेल तर ताटलीतले पाणी काढून टाकावे किंवा झाडाला पाणी कमीच घालावे.

घरात झाड ठेवताना, सजावटीला साजेशी आकर्षक कुंडी घ्यावी आणि त्या कुंडीत झाड असलेली कुंडी ठेवावी. त्यामुळे झाडाची कुंडी जरी काळी किंवा अस्वच्छ असली तरी चालू शकते. बाहेरच्या आकर्षक कुंडीची उंची झाडाच्या कुंडीच्या उंचीपेक्षा नेहमीच थोडी जास्त असावी. बाहेरच्या कुंडीचा आकार पण थोडा मोठा असावा म्हणजे झाडाची कुंडी आत बाहेर करताना त्रास होणार नाही.

तेव्हा एक कोपरा झाडाचा ठेवण्यासाठी आपल्याला तीन कुंडीतल्या झाडांची आवश्यकता आहे. अर्थात दोन कोपऱ्यांसाठी सहा कुंडय़ा!

drnandini.bondale@gmail.com