बदलापूर: रविवारी मुंबई येथून मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे गिर्यारोहणासाठी १३ जणांचा चमू आला होता. त्यातील साईराज चव्हाण हा २२ वर्षीय तरुण गडावरून तोल जाऊन दरीत पडला. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता. अखेर मंगळवारी या तरुणाचा मृतदेह शोधून काढण्यात आला. डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा तीव्र प्रवाह, पाऊस, दाट धुके, निसरडे झालेले खडक यामुळे तरुणाला शोधण्यात अडथळे येत होते.

मुरबाड तालुक्यातील सिद्धगड हे पावसाळ्यात गिर्यारोहकांना खुणावते. त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबई उपनगरातून गिर्यारोहक येथे येत असतात. मात्र माहितीचा अभाव, बदलणारा निसर्ग आणि मार्गदर्शनाअभावी अनेक पर्यटक येथे वाट चुकतात. काही पर्यटक एकट्याने जाण्याचे धाडस करतात. अशा काही प्रकरणांमध्ये गेल्या काही वर्षात गिर्यारोहकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यानंतरही गिर्यारोहकांचा येथे येणारा ओघ थांबलेला नाही.

रविवारी मुंबईतून १३ पर्यटकांचा एक चमू सिद्धगड येथे गिर्यारोहणासाठी आला होता. या चमूमध्ये २२ वर्षीय साईराज चव्हाण हा तरुणही होता. रविवारी गिर्यारोहण करत असताना साईराजचा तोल गेला आणि तो गडावरील खोल दरीत पडला. तेव्हापासून साईराजचा शोध घेतला जात होता. सिद्धगड परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसात तुफान पाऊस बरसला. या पावसामुळे साईराजचा शोध घेण्यात अनेक अडथळे येत होते. साईराजच्या शोधासाठी विविध गिर्यारोहकांची पथके दाखल झाली होती.

सोमवारी दरीत साईराजचा शोध लागला. मात्र त्याला बाहेर काढण्यात सोमवारी यश आले नाही. मंगळवारी पुन्हा साईराजचा मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. डोंगरावरून वाहणारा पाण्याचा तीव्र प्रवाह, संततधार पडणारा पाऊस, दाट धुके आणि निसरडी झालेली वाट यासारखे अनेक आव्हाने यावेळी बचाव पथकापुढे आली. अखेर मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास साईराज चव्हाण या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, अशी माहिती मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी दिली आहे. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खबरदारी घ्यावी

दरम्यान या घटनेनंतर मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी गिर्यारोहकांना खबरदारीचे आवाहन केले आहे. धोकादायक ठिकाणी जात असताना सुरक्षेची काळजी घ्यावी, असेही आवाहन देशमुख यांनी केले आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सिद्धगडावर अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होते आहे.