शहापूर : मुरबाड तालुक्यातील मोरोशी या शासकीय अदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने गुरुवारी पहाटे वसतिगृहाच्या छतास ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व महिला अधिक्षिका या दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.

शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणार्या मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक पहिले ते बारावी पर्यंत शासकीय आश्रम शाळा आहे. या शाळेत एकूण ४०५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील ७३ निवासी विद्यार्थिनींपैकी ६८ हजर होत्या. गुरुवारी पहाटे येथील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

शिक्षण विभागाचे साहाय्यक प्रकल्पधिकारी बी. आर. जाधव, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती एस. एल. पोकळा, के. एम. शिंदे व आर. बी. घोलप यांच्या नेमण्यात आलेल्या प्रकल्पस्तरीय चौकशी समितीने प्राथमिक अहवालात या शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि महिला अधिक्षिका जयश्री वाघाडे या दोघांवर ठपका ठेवला. या दोघांना निलंबित करण्याची शिफारस प्रभारी प्रकल्पधिकारी डी. डी. काळपांडे यांनी केल्यानंतर ठाण्याचे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांनी मुख्याध्यापक भोई व महिला अधिक्षिका वाघाडे यांच्या निलंबनाचे आदेश पारित केले.

याबाबत मुलीच्या आत्महत्ये प्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असल्याचे प्रभारी प्रकल्पधिकारी काळपांडे यांनी सांगितले असून शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याने आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याबाबत आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र मराडे यांनी दोषींना तत्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली आहे.