भारतीय जवानांच्या पराक्रमाची गाथा शब्दांत व्यक्त करता येत नाही. अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर थंडी-ऊन यांची पर्वा न करता देशवासीयांच्या रक्षणासाठी सीमा भागात लढत असतात. या वीर जवानांना सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या तेजाचे स्फुल्लिंग तरुणांमध्ये चेतवण्यासाठी डोंबिवलीत ‘कॅ. विनयकुमार सचान स्मृतिस्थळ’ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी भारतीय जवानांच्या पराक्रमाची गाथा वाचताना आणि पाहताना आपण भारावून जातो.

डोंबिवलीतील विद्यानिकेत शाळेचा विद्यार्थी असलेल्या कॅ. विनयकुमार सचान यांना २००३मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी मुकाबला करताना वीरमरण आले. ‘२७ राष्ट्रीय रायफल्स’मध्ये कॅप्टनपदी असलेले विनयकुमार हे सहकाऱ्यांचे प्राण वाचावेत म्हणून दहशतवाद्यांशी एकाकी झुंज देत राहिले आणि वयाच्या २६व्या वर्षीच देशासाठी शहीद झाले. डोंबिवलीच्या या वीर सुपुत्राचा यथोचित सन्मान व्हावा आणि त्याच्या बलिदानाचे धडे तरुणाईला देता यावेत यासाठी डोंबिवलीत पेंढारकर महाविद्यालयाच्या जवळ ‘कॅ. विनयकुमार सचान स्मृतिस्थळ’ उभारण्यात आले. कल्याण-डोंबिवली महापालिकेने जरी हे स्मृतिस्थळ उभारले असले तरी त्याची सर्व देखभाल विद्यानिकेतन शाळेकडून केली जाते.
या स्मृतिस्थळाच्या प्रवेशद्वाराजवळच १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात वापरण्यात आलेला ‘विजयंता’ हा युद्ध रणगाडा ठेवण्यात आला आहे. जवानांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या या स्मृतिस्थळ गॅलरीत शहीद झालेल्या आणि परमवीरचक्र मिळविणाऱ्या सैनिकांची माहिती मिळते. या जवानांची शिल्परूपी प्रतिकृती तयार करण्यात आली असून, त्याचबरोबर त्यांच्या अतुल्य कामगिरीची माहितीही देण्यात आली आहे. त्याचबरोबर परमवीर चक्र म्हणजे काय? ते का दिले जाते? आणि आतापर्यंत कुणाकुणाला ते देण्यात आले याबाबतची सविस्तर माहिती या स्मृतिस्थळी मिळते. विशेष म्हणजे या स्मृतिस्थळी ‘एसएलआर ७.६२मिमी’, ‘एसएलआर ६२मिमी’, ‘५०३ एलएमजी’, ‘३०३ रायफल’, ‘.३०३ रायफल’ यांच्या प्रतिकृती आहेत. त्याचबरोबर वाघा बॉर्डर, बांगलादेश निर्मिती करार यांच्याही प्रतिकृती आहेत. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे लष्करी अधिकारी म्हणजे, फिल्ड मार्शल मानेकशॉ, एअर चिफ मार्शल हृषीकेश मूळगावकर या अधिकाऱ्यांची माहिती या स्मृतिस्थळी पाहायला मिळते.
महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, टी. लासोर्डा, अविनाश बर्वे यांची भारतीय जवनांचे महत्त्व व पराक्रम सांगणारी वचने सर्वत्र लावण्यात आलेली आहेत. हे स्मृतिस्थळ पाहताना देशभक्तीपर गीते ऐकविली जातात.. ती ऐकत ऐकत हे स्मृतिस्थळ पाहताना आपण आपसूक नतमस्तक होतो.

कसे जाल?

कॅ. विनयकुमार सचान स्मृतिस्थळ, डोंबिवली
> डोंबिवली स्थानकातून पेंढारकर महाविद्यालयाकडे जाण्यासाठी महापालिकेची बस व्यवस्था आहे. घर्डा सर्कल येथे उतरावे.
> रेल्वे स्थानकापासून रिक्षानेही या स्मृतिस्थळी जाता येते.
> कल्याण-शिळ रस्त्यावर विको नाक्यावरूनही या ठिकाणी जाता येते.
(हे स्मृतिस्थळ सकाळी ११ ते १ आणि संध्याकाळी ४.३० ते ६ या वेळेत खुले असते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि २४ मार्च (विनयकुमार सचान स्मृतिदिन) या दिवशी ते दिवसभर खुले असते.)