ठाणे : इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी आता ‘संग्रहालय’च शाळेच्या दारात पोहोचणार आहे. प्राच्यविद्या अभ्यास संस्थेने ‘प्राच्यविद्या अभ्यास संस्था तुमच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला असून, त्याअंतर्गत तयार करण्यात आलेले ‘ट्रंक म्युझियम’ ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये नेण्याचा संस्थेचा मानस आहे.

इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्राची ओळख विद्यार्थ्यांना प्रामुख्याने पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून होते. मात्र ऐतिहासिक वस्तू प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्यामागील संदर्भ समजून घेण्याची संधी अनेक विद्यार्थ्यांना मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन प्राच्यविद्या अभ्यास संस्थेने संग्रहालयातील कलावस्तूंच्या प्रतिकृती तसेच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश असलेले कलात्मक ‘ट्रंक म्युझियम’ तयार केले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये इतिहास, पुरातत्त्व आणि सांस्कृतिक वारशाविषयी कुतूहल निर्माण करणे, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे आणि या विषयांमध्ये रुची निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. वस्तू आणि त्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांसमोर ठेवून त्यांचा ऐतिहासिक संदर्भ सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने समजावून सांगण्यात येणार आहे.

ठाणे शहरातील इतिहास आणि सांस्कृतिक वारशाशी संबंधित संस्था व संग्रहालयांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यावरही या उपक्रमात भर देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक इतिहासाची ओळख होण्याबरोबरच विद्यार्थ्यांना देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात ठाणे महापालिकेच्या शाळांपासून करण्याचा संस्थेचा मानस आहे. यासाठी संस्थेतर्फे महापालिका आयुक्त आणि महापौरांना पत्र पाठवून विनंती करण्यात आली आहे. संबंधित शाळेने तारीख निश्चित केल्यानंतर संस्थेची टीम ‘ट्रंक म्युझियम’ घेऊन शाळेत पोहोचणार आहे. सुमारे एक तासाच्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना संग्रहातील कलावस्तू, त्यांच्या प्रतिकृती, ऐतिहासिक वस्तू आणि त्यांच्याशी संबंधित माहिती देण्यात येणार आहे. शाळेच्या परिसरातच हा अनुभव मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना इतिहास आणि पुरातत्त्वाचा अभ्यास अधिक रंजक पद्धतीने करता येणार आहे.