काँग्रेस नगरसेवकाचे घर जाळण्याचा प्रयत्न

आगीवर घरातील ब्लँकेट टाकून तसेच पाणी ओतून आग अटोक्यात आणली.

zubair-inamdar
काँग्रेस नगरसेवक जुबेर इनामदार छायाचीत्र. सौजन्य ट्विटर

अमली पदार्थविरोधी मोहिमेचा राग

अमली पदार्थाविरोधात मिरा रोड येथे काँग्रेस पक्षाकडून सुरू  करण्यात आलेल्या मोहिमेचा राग येऊन समाजकंटकांकडून शुक्रवारी मध्यरात्री नगरसेवक जुबेर इनामदार यांचे घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी इनामदार यांच्या मुलींनी प्रसंगावधान राखत वेळीच ही आग रोखली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकाचे कृत्य सीसीटीव्हीत उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आसिफ खान आणि युनेब केवल यांच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

मिरा रोड येथील नयानगर भागात काँग्रेसने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने अमली पदार्थाविरोधात मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक भागात काँग्रेसचे नगरसेवक अमली पदार्थाविरोधात स्थानिकांमध्ये जनजागृती करत आहेत. माजी उपमहापौर नूरजहाँ हुसेन आणि काँग्रसचे महानगरपालिकेतील गटनेते जुबेर इनामदार यांनी  पुढाकार घेतला आहे. इनामदार  पत्नीसह गावी गेले होते. त्यांच्या दोन मुली घरात  होत्या. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक तरुण पेट्रोल असलेली बाटली घेऊन इनामदार राहात असलेल्या नयानगरमधील मीरा स्मृती या इमारतीत शिरला. घराच्या दरवाजाला त्याने बाहेरून कडी घातली आणि नंतर दरवाजावर पेट्रोल ओतून तो पेटवून दिला. यावेळी पेट्रोलचा जोरदार भडका उडाला.  घरात झोपलेल्या इनामदार यांच्या मुलींना आवाजामुळे जाग आली. धरात धूर पसरत असल्याचे दिसताच त्यांनी दरवाजाकडे धाव घेतली  त्यांनी तातडीने आगीवर घरातील ब्लँकेट टाकून तसेच पाणी ओतून आग अटोक्यात आणली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Trying to burn congress corporator house in mira road