कल्याण – राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त, गैरप्रकाराने खाद्यान्य विक्री करणाऱ्या उत्पादक, आस्थापनांवर गेल्या दीड महिन्यांपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे. याच कारवाईतून गेल्या पंधरा दिवसापूर्वी कल्याणमधील तीन टपरी चालकांवर कारवाई करून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने लाखो रूपयांचा गुटखा जप्त करून नष्ट केला. टपरी चालकांवर गुन्हे दाखल केले. अशाच पध्दतीची दुसरी कारवाई कल्याणमधील गोविंदवाडी बाह्यवळण रस्ता बिस्मिल्ला मस्जिद भागातील आवेश जनरल स्टोअर्स दुकानात करून बाजारपेठ पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाने प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला आहे. संबंधित टपरी चालकावर गुन्हा दाखल केला.

नियमात मदार सय्यद यांच्या विरुध्द प्रतिबंधक गुटख्याचा साठा आणि विक्री केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात हवालदार प्रमोद शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळयुक्त पदार्थ, प्रतिबंधात्मक वस्तू विक्री विरूध्द जोरदार कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीतील पोलीसही अशा कारवाया करत आहेत.

चार दिवसापूर्वी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक टी. एम. राठोड, हवालदार पवार, पाटील, गोड आणि प्रमोद शिंदे आपल्या बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत गैरप्रकार रोखण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी त्यांना एक माहितगाराने माहिती दिली की कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी बाह्यवळण रस्ता भागातील बिस्मील्ला मस्जिदजवळ एक इसम आपल्या दुकानात प्रतिबंधित गुटखा विक्री करत आहे. तसेच, त्याच्या घरातही प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आपले वाहन तात्काळ बिस्मिल्ला मस्जिद भागात नेले. सोबत पंच घेतले.

पोलिसांनी आपले वाहन आवेश जनरल स्टोअर्स दुकानासमोर नेले. दुकान मालक मदार सय्यद यांच्या दुकानाजवळ उभे केले. पोलिसांनी त्यांना छाप्याची कल्पना देऊन त्याच्या दुकानात छापा टाकला. यावेळी दुकानात विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, बाजीराव पान मसाला , तुलसी तंबाखुची पाकीटे आढळुन आली. मानवी आरोग्यास हे पदार्थ घातक असल्याने महाराष्ट शासनाने मागील काही वर्षापूर्वीच या वस्तू विक्रीवर बंदी आणली आहे. हे माहिती असुनही नियमात सय्यद या वस्तू चोरून लपून विकत होता.

ही माहिती पोलिसांनी तात्काळ ठाणे येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकऱ्यांना दिली. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे बाजारपेठ पोलिसांना सूचित केले. या आदेशाप्रमाणे बाजारपेठ पोलिसांनी नियामत सय्यद यांच्या घराचीही झडती घेतली. तेथे संशयास्पद वस्तू किंवा गुटख्याचा साठा आढळला नाही. पोलिसांनी हा साठा जप्त केला. नियमात यांना ताब्यात घेतले. नियमात यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४ आणि अन्न आणि सुरक्षा मानके कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. भिवंडीचा पुरवठादार हा प्रतिबंधित गुटख्याचा साठा आपण भिवंडी येथील अरफाज या इसमाकडून खरेदी केला असल्याची माहिती नियमात सय्यद यांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी अरफाज याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. कल्याण, डोंबिवलीत पोलीस, अन्न आणि औषध प्रशासन विभागाने आतापर्यंत टपरी चालकांवर केलेल्या कारवाईत बहुतांशी पान टपरी चालकांनी प्रतिबंधित गुटखा आपण भिवंडी येथील घाऊक विक्रेत्याकडून आणला असल्याची माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भिवंडीत मोठी कारवाई केली आहे. अरफाजकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.