Shinde Sena demands immediate Tukaram Mundhe FDA action on hotels and street food in Dombivli: पावसाळा सुरू झाला की कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागाकडून उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करण्यास बंदी घातली जाते. मागील दोन वर्षापासून पालिकेकडून या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे डोंबिवली शहरांमध्ये उघड्यावर निकृष्ट खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांची संख्या वाढली आहे. हाॅटेल्स, ढाब्यांमध्ये गुणवत्ता नसलेले पनीर आणि दुग्धजन्न पदार्थ विक्री केले जात आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध विभागाच्या पथकांनी डोंबिवली शहराच्या विविध भागात छापे मारून विक्री केल्या जाणाऱ्या विविध पदार्थांची तपासणी करून याप्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेविका मनीषा शैलेश धात्रक यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली आहे.

डोंबिवली शहराच्या विविध भागात हाॅटेल्स आहेत. या हाॅटेलच्या भटारखान्यात स्वच्छता नसते. खाद्य पदार्थ तयार करणारे सर्व सामान उघडे ठेवल्याने तेथे माशांचे थवे फिरत असतात. काही ठिकाणी उंदिर, झुरळे यांचा प्रादुर्भाव आहे. अशा वातावरणात तयार केलेले पदार्थ हाॅटेलमध्ये ग्राहकांना खाण्यास दिले जातात. पनीर खाण्याकडे नागरिकांचा अधिक ओढा असतो. हे पनीर उत्तम दर्जाचे आहे का याची चाचपणी न करता, त्याची गुणवत्ता पारख न करता हाॅटेल, ढाब्यांमध्ये ग्राहकांना ते खाण्यास दिले जाते. अनेक स्वीट मार्टमध्ये दुकानांमध्ये दुग्धजन्य पदार्थ विक्री केले जातात. त्यांचा दर्जा तपासण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेविका धात्रक यांनी आयुक्त मुंढे यांच्याकडे केली आहे.

हातगाड्यांचा सुळसुळाट

डोंबिवली पूर्व पश्चिम भागात रस्तोरस्ती संध्याकाळी चार ते रात्री उशिरापर्यंत विक्रेत्यांकडून हातगाड्या लावल्या जातात. पालिकेच्या आरोग्य विभाग आणि स्थानिक फेरीवाला हटाव पथकाचे या हातगाडी चालकांवर नियंत्रण नाही. त्यामुळे या हातगाड्यांवर पनीर, सोया चिली, मोमोज, चायनिज भेळ, मंच्युरियन भेळ, चिकन शोरमा, शेजवान मंच्युरियन इतर चटपटीत पदार्थ विक्रीस ठेवण्यात येतात. हे पदार्थ बनविणे, तेथील उष्टी भांडी धुण्यासाठी दोन ते तीन बादल्या पाणी वापरले जाते. या तीन बादल्यांच्या पाण्यात पदार्थ तयार करणे, तेच ग्राहकांना पिण्यास देणे असे प्रकार या हातगाड्यांवर सुरू असतात.

तरूण पीढी या खादय पदार्थांकडे सर्वाधिक आकृष्ट होते. त्यामुळे उमेदीच्या काळात या तरूणांना असे चटपटीत निकृष्ट खाद्यपदार्थ खाऊन विविध व्याधी जडण्याची, आजार होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण डोंबिवली शहराच्या पूर्व, पश्चिम भागात अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकांना अचानक छापेमारी करण्याचे आदेश द्यावेत. जेणेकरून या पदार्थांच्या माध्यमातून नागरिकांचे बिघडणारे आरोग्य सुस्थितीत राहण्यास मदत होणार आहे, असे शिंदे शिवसेनेच्या मनीषा धात्रक यांनी आयुक्त मुंढे यांच्या निदर्शनास आणले आहे.

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता, गरीबाचापाडा, पंडित दिनदयाळ रस्ता, सम्राट हाॅटेल, घनश्याम गुप्ते रस्ता भागात उघड्यावर खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांची सर्वाधिक संख्या आहे. या हातगाड्यांवर पालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. अशा कारवाईसाठी आणि संबंधितांवर फौजदारी कारवाईसाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी धात्रक यांनी केली आहे.