ठाणे – राज्य अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधातील कारवायांचा अक्षरशः धडाका सुरू झाला आहे. ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबवत अन्न व औषध प्रशासनाने अवघ्या सात दिवसांत राज्यभरात मोठी मोहीम उभी करत कारवाईची तीव्रता वाढवली आहे. या आक्रमक मोहिमेमुळे भेसळयुक्त आणि प्रतिबंधित पदार्थांचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
२५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाने तब्बल १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १०२ जणांना अटक करण्यात आली असून २०३ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८६ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्पष्ट निर्देशानुसार राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तत्सम पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम उघडण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी राज्यातील विविध भागांत एकाच वेळी धडक कारवाया करत तब्बल १३० ठिकाणी छापे टाकले. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू आणि इतर प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले.
विशेष म्हणजे केवळ गुटखाविरोधातील कारवाईपुरते मर्यादित न राहता अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त, अस्वच्छ आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांवरही कठोर कारवाई सुरू केली आहे. मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, तेल, मसाले, खाद्यपदार्थांचे उत्पादन केंद्र तसेच हॉटेल आणि खाद्य व्यवसायांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांविरोधात थेट दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील अन्न व्यवसायिकांमध्ये प्रशासनाची मोठी दहशत निर्माण झाली असून नियम पाळण्याकडे कल वाढू लागला आहे.
“नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भेसळयुक्त अन्न, निकृष्ट दर्जाचे पदार्थ किंवा प्रतिबंधित वस्तूंची विक्री आढळल्यास आणखी कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत कोणतीही शंका, तक्रार अथवा भेसळीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ तसेच jc-foodhq@nic.in या ई-मेलवर तक्रार नोंदविता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
