ठाणे – गणेशोत्सव जवळ आल्याने अनेकजण गावी निघाले आहेत. गावी जाण्यापूर्वी शहरातून चिवडा, फरसाण इत्यादी वस्तू नेत असतात. परंतु या वस्तू नेण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा… कारण ही बातमी वाचल्यावर तुमचा विचार बदलू शकतो.
गणेशोत्सवात गावी जाण्यापूर्वी गावामध्ये खाद्य पदार्थ, चिवडा, फरसाण शहरातून अनेकजण नेतात. दरम्यान, महत्वाची करवाई तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत अन्न व औषध प्रशासनाने ठाण्याजवळील खर्डी गाव परिसरातील ११ खाद्यपदार्थ निर्मिती व विक्री आस्थापनांवर धाडी टाकून तब्बल २० लाख ४८ हजार ८०१ रुपयांचा खाद्यसाठा, कच्चा माल आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे २८ हजार ९५५ किलो खाद्यपदार्थ आणि ५६ लिटर तेलाचा समावेश आहे.
खाद्यपदार्थांमध्ये भेसळ तसेच निकृष्ट दर्जाचे पदार्थ वापरले जात असल्याच्या संशयावरून पथकाने ९ सप्टेंबर रोजी ही कारवाई केली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत खाद्यपदार्थांची निर्मिती होत असल्याचे आढळले. उत्पादन विभागातील फरशीवर तेलकटपणा आणि घाण साचल्याचे, तर काही ठिकाणी तात्पुरत्या पत्र्यांच्या शेडमध्ये खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने परिसरात सांडपाणी साचले होते. त्यामुळे दुर्गंधीचेही साम्राज्य होते. काही आस्थापनांमध्ये झुरळे आणि उंदीर आढळून आले. याशिवाय परिसरात जनावरांचा वावर असल्याचेही तपासणीत समोर आले. खाद्यपदार्थ तयार करणारे कर्मचारी अस्वच्छ कपड्यांमध्ये काम करत होते. त्यांच्याकडे एप्रन, हातमोजे आणि डोक्यावर घालण्याचे संरक्षक साहित्यही नव्हते.
काही आस्थापनांकडे आवश्यक अन्न परवाना नसल्याचे आढळले. पॅकबंद खाद्यपदार्थांच्या लेबलवरही नियमानुसार आवश्यक माहिती नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान बटाटा वेफर्स, फराळी चिवडा, मसाला वेफर्स, मिक्स फरसाण, शेव, बाकरवडी, चिवडा, उपासाचा चिवडा, शेझवान स्टिक्स, केळीच्या चिप्ससह मैदा, बेसन आणि वाटाणा पीठ यांसारखा कच्चा माल जप्त करण्यात आला. पामोलीन तसेच वापरलेले खाद्यतेलही जप्त करण्यात आले.
