Tukaram Mundhe FDA Action Bhiwandi: भिवंडी येथील माणकोली-दापोडे भागात विनापरवाना सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपुर्वी केली असून त्यापाठोपाठ आता पुन्हा भिवंडीतील सरलगाव परिसरातील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. कालबाह्य आणि मानवी आरोग्यास घातक अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते बाजारात विक्रीसाठी पाठविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात ॲमेझॉन कंपनीच्या व्यवस्थापकासह दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात मोहिम उघडली आहे. पानमसाला, गुटखा आणि औषध दुकानांविरोधातही कारवाई करत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात त्यांची पथके कारवाई करत आहेत. अनेक ठिकाणी पथके धाडी टाकत असून यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. या विभागाच्या पथकाने काही दिवसांपुर्वी भिवंडी येथील माणकोली-दापोडे भागात विनापरवाना सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून कारवाई केली होती. त्यापाठोपाठ आता पुन्हा भिवंडीतील ॲमेझाॅन कंपनीच्या एका गोदामावर धाड टाकून कारवाई केली असून याप्रकरणी ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद वसंत कांडेलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यातील सरवली गाव येथील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.च्या वितरण केंद्रात अन्न व औषध प्रशासन विभागाने २४ जून २०२६ रोजी तपासणी केली. या तपासणीत कालबाह्य आणि खराब अन्नपदार्थांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी वळविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आर. के. ट्रेडर्सचे मालक रहमान के. यांनी करारातील अटींचे पालन केले नाही आणि अन्नपदार्थांची विल्हेवाट लावल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केले. तसेच ॲमेझॉन रिटेल इंडियाचे पश्चिम विभागाचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नुर आणि कालबाह्य अन्नपदार्थांच्या विल्हेवाट प्रक्रियेशी संबंधित कर्मचाऱ्यांचा या प्रकारात सहभाग असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे, असे ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद वसंत कांडेलकर यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी नागरिकांची दिशाभूल करून मानवी आरोग्यास धोका निर्माण करणारे अन्नपदार्थ अन्नसाखळीत आणून विक्री केल्याच्या आरोपावरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), २७४, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६(१), २६(२)(आय), २७(१), २७(३)(ई) आणि ३१(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष बोराडे करत आहेत. या संदर्भात कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नेताराम म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा देत याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.