Tukaram Mundhe FDA Action on APMC Market: गेल्याकाही दिवसांपासून संपूर्ण राज्यात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने नवी मुंबई आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात ‘एपीएमसी’वर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच, भेसळ करणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील घाऊक विक्रेत्यांवरही पाळत ठेवली जाणार आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नेमणूक झाल्यानंतर सर्व गुटखा विक्रेते आणि तस्करांचे धाबे दणाणले आहेत. तसेच, भेसळखोरांचाही पथक शोध घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करत आहे. राज्यात भेसळ करणाऱ्याविविध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांवर ११ आणि १२ जूनला कारवाई करण्यात आली.
यामध्ये मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती नागपूर इत्यादी ठिकाणी धाडी टाकल्या. तसेच खाण्यास असुरक्षित, हलक्या दर्जाच्या, अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया केलेल्या आणि दिशाभूल करणाऱ्या पॅकिंगवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत ३५ आस्थापनांवर कारवाई करुन सुपारी, खाद्य तेल, पिण्याचे पाणी, दूध, दूग्धजन्य पदार्थ, खवा, पेढा, तूप, गूळ इत्यादी अन्न पदार्थ आणि भेसळ करण्यासाठी वापरलेले अन्न पदार्थ जप्त केले. या कारवाईत एकूण ३ कोटी ४८ लाख ३७ हजार २३२ रुपये किमतीचा १ लाख ९२ हजार ८२९.९३ किलो इतका साठा जप्त केला.
यामध्ये कोकण क्षेत्रातील ६ आस्थापनांचा सामावेश असून ३१ लाख ५३ हजार ४१० रुपये किमतीच्या आणि १४०२६.१ किलो साठ्याचा सामावेश आहे. या कारवाईनंतर अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील ‘एपीएमसी’वर करडी नजर ठेवली असून घाऊक वस्तू विक्रेत्यांवरही पाळत ठेवली आहे. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांच्या हाती सुरक्षित अन्न पदार्थ पडू लागले आहे.
