ठाणे : टीडब्ल्यूजे या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्यप्राय परताव्याचे आमिष दाखवून सुमारे १२०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे यांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना गुजरातमधून अटक केली आहे.

९ फेब्रुवारी २०२४ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत टीडब्ल्यूजे या कंपनीचे संस्थापक व संचालक समीर नार्वेकर, अमित बालम तसेच कंपनीशी संबंधित व्यवस्थापकांनी ठाणेसह संपूर्ण राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये टीडब्ल्यूजे नावाने विविध कंपन्या उघडून सदर कंपन्यामध्ये सुमारे ११,००० गुंतवणूकदारांना बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्यप्राय परताव्याचे आमीष दाखवून सुमारे १२०० कोटी रुपयांचा अपहार केलेबाबतची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीअंती विक्रोळी येथील रहिवासी संजय मापुसकर यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन गुन्हा नोंदविण्यात आला होता. सुरुवातीला फिर्यादी व अन्य १३ गुंतवणूकदारांची सुमारे ३ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. परंतू, पुढील तपासादरम्यान एकूण ३७ गुंतवणूकदारांची सुमारे ७ कोटी ९७ हजार ८६९ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून प्राथमिक तपासात संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे १२०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

आरोपी अटक – या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. परंतू, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास करून समीर सुभाष नार्वेकर (वय ३५) आणि अमित विश्वनाथ बालम (वय ३७) यांना २९ जानेवारी तर, नेहा समीर नार्वेकर (वय ३६) यांना ३० जानेवारी रोजी अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांच्याकडे असून तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी पुढील तपास करत आहेत.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून आवाहन…

– टीडब्ल्यूजे असोसिएटेड प्रा. लि. तसेच संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे येथे पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांच्याशी मोबाईल क्रमांक ८८०५४८६१०० किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३९८५८६ वर संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.