ठाणे : बदलापूर येथील शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच, भिवंडी येथील अनाथ आश्रमात एका अडीच वर्षांच्या मुलीला चटके देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अनाथ आश्रमाचा संचालक दत्ता गायसमुद्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पिडीत मुलीचे आई-वडिल भिक्षेकरू आहे. तीन महिन्यांपूर्वी मुलीच्या आजीने तिला धामणकर नाका येथील शोभा अनाथ आश्रम आणले होते. तेव्हापासून ती मुलगी या आश्रमात वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वी तिच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या होत्या. त्यामुळे तिच्या आजीने तिला ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.
उपचारा दरम्यान तिच्या पोटावर, डाव्या कानाच्या मागे, डाव्या डोळ्याच्या बाजूला चटके दिल्याच्या जखमा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर पिडीत मुलीच्या आजीने याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अनाथ आश्रमाचा संचालक दत्ता गायसुमद्रे याच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली.