ठाणे: भिवंडी येथील भादवड नाका ते सोनाळे या मार्गावर पिस्तुलीचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. शुभम मिश्रा (२५) आणि आशिष श्रीवास्तव (३६) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी जप्त केली आहे. यातील आशिष हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात पुणे येथे घरफोडीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
येत्या काही दिवसांत महापालिका निवडणूका लागण्याची शक्यता असल्याने अवैधरित्या हत्यार बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांविरोधात ठाणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्याप्रमाणे भिवंडीचे साहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनीही शांतीनगर पोलिसांना तशा सूचना दिल्या होत्या. दरम्यान, उपनिरीक्षक निलेश जाधव हे त्यांच्या पथकासह मंगळवारी भादवड नाका येथे गस्ती घालत असताना दोन जण गावठी पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती त्यांच्या पथकाला मिळाली होती. पथकाने ही माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांना दिली. त्यानुसार काबाडी यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतली. त्यांची झडती घेतली असता, पोलिसांना त्यांच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे शुभम आणि आशिष असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. यातील आशिष विरोधात पुण्यातील शिरुर पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.
