कल्याण - येथील दुर्गाडी पुलावर सोमवारी रात्री एका ट्रक चालकाची रात्रीच्या वेळेत दोनजणांनी धारदार चाकूने हत्या केली होती. या प्रकरणातील दोन फरार मारेकऱ्यांना अटक करण्यात खडकपाडा आणि रेल्वे पोलिसांना यश आले आहे. अंजला लियाकत खान (२३), मोहम्मद अनस शेख (२१) अशी आरोपींची नावे आहेत. खान हा कल्याणमधील गोविंदवाडी भागात तर, शेख हा दुर्गाडी किल्ल्याजवळील कोन गावात राहतो. या दोघांनी सोमवारी रात्री दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला रस्त्यावर ट्रक बंद पडल्याने टायर बदलण्याचे काम करणारा चालक भोलाकुमार महातो याची धारदार शस्त्राने हत्या केली होती. रस्त्यावर ट्रक थांबविल्याने दुचाकीचे नुकसान झाले असून ते भरून देण्याची मागणी खान आणि शेख यांनी महतो यांच्याकडे केली होती. परंतु आपली मागणी पूर्ण होत नसल्यामुळे दोघांनी महातो यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांना जागीच ठार केले. हेही वाचा - बाह्य वळण रस्त्याच्या मार्गात डोंबिवलीतील आयरे भागात बेकायदा इमारतीची उभारणी, विकास आराखड्यातील रस्ता बाधित हेही वाचा - वाहनतळ बंद करण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वाराला लोखंडी द्वार खडकपाडा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यावेळी एका आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत होता. दोन्ही आरोपी रेल्वेने प्रवास करण्याची शक्यता होती. बाजारपेठ पोलिसांनी रेल्वेचे पोलीस निरीक्षक शिवरामवार, साहाय्यक निरीक्षक हावळे यांना संपर्क केला. दोन आरोपी वांद्रे टर्मिनस येथून रेल्वेने बाहेरच्या प्रांतात पळून जाण्याची शक्यता वर्तवली. रेल्वे पोलिसांनी वांद्रे टर्मिनस येथे सापळा लावला. सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान अंजला खान याला वांद्रे स्थानकातून अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद शेखला अटक केली. या आरोपींना खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.