ठाणे : बनावट नोटा छापणारे दोघे ताब्यात ; प्रिंटरच्या साहाय्याने घरीच करत होते छपाई

बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे.

arrest
( प्रतिनिधिक छायाचित्र )

बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. मोहम्मद जैद चाँदबादशहा शेख (२५) आणि एका १७ वर्षीय मुलाचा यात सामावेश असून पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे कागद, लॅपटाॅप, १०० रुपये दराच्या सुमारे ३५० बनावट जप्त केल्या आहेत. याप्रकारामुळे पुन्हा एकदा बनावट चलनी नोटांचा मुद्दा उपस्थित झालेला आहे.

मुंब्रा येथील वाय जंक्शन भागात एकजण बनावट नोटा चलनात आणण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने सापळा रचून मोहम्मद जैद चांदबादशहा शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्या पिशवीत १०० रुपये दराच्या २५० बनावट नोटा आढळून आल्या. या सर्व चलनी नोटांवर एकच क्रमांक होता. पोलिसांनी त्याची चौकशी त्याचा एक १७ वर्षीय साथिदार या बनावट नोटा घरातच बनवत असल्याचे समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी १७ वर्षीय मुलाच्या घरी जाऊन झडती घेतली. पोलिसांना पाहताच त्याने ५०० रुपयांच्या दराच्या बनावट नोटांची १५ कागदांची पाने, २०० रुपये दराची नऊ आणि १०० रुपये दराच्या १६० पाने पाण्यामध्ये फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या घरामध्ये एक लॅपटाॅप, चलनातील १०० रुपये दराच्या ९१ बनावट नोटा, कागद असा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींनी यापूर्वी अशा बनावट नोटा चलनात आणल्या होत्या का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two arrested in fake note case thane police crime branch amy

Next Story
शहापूर तालुका शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी