scorecardresearch

मीरा भाईंदर: महासभा सुरू असताना २ भाजपा नगरसेविका आपसात भिडल्या, घटनेचा LIVE VIDEO

मीरा भाईंदर महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा सुरू असताना दोन भाजपा नगरसेविका आपसात भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा सुरू असताना दोन भाजपा नगरसेविका आपसात भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही नगरसेविका एकमेकांच्या अंगावर धावून गेल्या होत्या. या प्रकारामुळे सभागृहातील उपस्थित सदस्य आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अडीच वाजता मीरा भाईंदर महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मीरा रोड येथे आरक्षण क्रमांक २६१ या जागेवर उद्यान आरक्षित असताना बारची निर्मिती होत असल्याचा विषय भाजपा नगरसेविका निला सोन्स यांनी प्रस्तावित केला. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सभा यावर निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न पुढील महासभेत घेण्याचा आदेश आपण देत असल्याचे पिठासीन अधिकारी म्हणून बसलेले उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी सांगितले.

यामुळे संपूर्ण महासभेतील वातावरण तापलं. दरम्यान, भाजपा नगरसेविका तथा आमदार गीता जैन पुढील विषय मांडण्यासाठी उभ्या राहिल्या. यावेळी भाजपा नगरसेविका हेतल परमार यांनी काहीतरी भाष्य केलं. त्यावर गीता जैन यांनी देखील परमार यांना ‘अपने औकात में रेह’ असं प्रत्युत्तर दिलं. यामुळे हेतल परमार या चवताळून गीता जैन यांना मारण्याकरिता अंगावर धावून गेल्या.मात्र यावेळी उपस्थितीत सभागृह सदस्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र प्रसारित झाल्यामुळे दोन्ही नगरसेविकेच्या कृत्याचा निषेध करण्यात येत आहे.

याप्रकरणावर आपली बाजू मांडताना भाजपा आमदार आणि नगरसेविका गीता जैन म्हणाल्या की, “हेतल परमार यांनी सभागृह सदस्या निला सोन्ससाठी ‘दो टक्के की औरत’ अशी टिप्पणी केली. जी अतिशय चुकीची आहे. याचा विरोध करण्यासाठी मी ते भाष्य केलं. माझे भाष्य चुकीचं होतं, हे मी मान्य करते. मात्र परमार यांना देखील भर महासभेत इतक्या खालच्या पातळीवर बोलण्याचा अधिकार नाही.”

दुसरीकडे, भाजपा नगरसेविका हेतल परमार यांनी सांगितलं की, “आमदार गीता जैन या पिठासीन अधिकारी म्हणून बसलेल्या उपमहापौर हसमुख गेहलोत याचा अपमान करत होत्या. त्यामुळे मी या गोष्टीचा विरोध करण्यासाठी उभी राहिली होती. मात्र गीता जैन यांनी माझ्यासाठी अपशब्द वापरले. त्यामुळे मी त्यांना केवळ सांगण्यासाठी त्यांच्याजवळ गेली होती, मारण्यासाठी नाही.”

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two bjp women corporators clashed in general assembly of mira bayander municipal corporation live video rmm

ताज्या बातम्या