कल्याण- मध्य रेल्वेच्या आंबिवली – टिटवाळा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गातून जात असलेल्या तीन म्हशींना शुक्रवारी संध्याकाळी लोकल ट्रेनची जोरदार धडक बसली. यामध्ये दोन म्हशी लोकलच्या चाकांखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. एक म्हैस धडकेने बाजुला फेकल्याने ती थोडक्यात बचावली. ही म्हैस जखमी झाली आहे, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

कल्याणहून निघालेली एक लोकल टिटवाळाच्या दिशेने जात होती. टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गात अचानक तीन म्हशी आल्या. मोटारमनने आवश्यक प्रयत्न करून म्हशींना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकल वेगात असल्याने मोटरमनचे प्रयत्न असफल झाले. तीन म्हशींना लोकलची जोराची धडक बसली. त्यापैकी दोन म्हशी चाकांखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक म्हैस लोकलच्या धडकेने रुळाच्या बाजुला फेकली गेल्याने ती थोडक्यात बचावली. मात्र ती गंभीर जखमी झाली आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

धडक बसल्यानंतर डबा घसरल्यासारखा जोरदार आवाज झाल्याने प्रवासी घाबरले. मोटरमनने तत्काळ ब्रेक दाबून लोकल थांबवली. यानंतर रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी आले. त्यांनी मृत म्हशींना रेल्वे मार्गातून बाहेर काढले. या एक तासाच्या दरम्यान कल्याणहून टिटवाळा, आसनगाव, कसाराकडे जाणाऱ्या लोकल, लांबपल्ल्याच्या गाड्या कल्याण, शहाड, आंबिवली, ठाकुर्ली परिसरात थांबविण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

कल्याण येथून पाच वाजून एक मिनिटानी निघालेली आसनगाव टिटवाळा स्थानकापूर्वी ४० मिनिटे खोळंबली होती. उन्हाच्या चटक्यांनी तापलेले टप, त्यात एकाच जागी लोकल उभी राहिल्याने प्रवासी घामाच्या धारांनी भिजून गेले होते. चार वाजून चाळीस मिनिटांनी ही घटना घडली होती. त्यानंतर एक तासात मृत म्हशींना मार्गातून बाहेर काढून ५ वाजून ४० मिनिटांनी या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली, असे ट्वीट मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी केले.

या घटनेमुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. म्हशी कोणाच्या मालकीच्या आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत.