कल्याण : कल्याण पूर्व, बदलापूरमध्ये दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन बालकांचा अपघाती मृत्यू झाला. एक बालक दोन वर्षाचा तर एक बालक १७ वर्षाचा आहे. कोळसेवाडी, मानपाडा पोलीस ठाण्यात या दोन्ही घटनांची अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील माहिती अशी, की कल्याण पूर्वेत खडेगोळवली शिवशक्ती नगर चाळ भागात प्रजापती कुटुंब राहते. बेबी वकील प्रजापती यांचा मुलगा आशुतोष प्रजापती (१७) हा शनिवारी दुपारी आपल्या घराला लागून असलेल्या बदामाच्या झाडाची पाने खुडण्यासाठी चाळीच्या भिंती, छतावरील पत्राच्या आधाराने चढला. छतावर चढल्यानंतर आशुतोष बदामाच्या झाडाची पाने उभा राहून खुडत होता.

झाडांच्या फांद्यांच्यामधून विद्युत तारा गेल्या आहेत. याची जाणीव आशुतोषला होती. त्यामुळे तो सांभाळुन पाने खुडत होता. नजर चुकीने त्याचा धक्का विद्युत तारेच्या जीवंत वीज वाहिनीला लागला. वीजेच्या धक्क्याने तो फेकला गेला. तो काही क्षणात बेशुध्द पडला. त्याला तात्काळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले.आशुतोषची आई बेबी प्रजापती यांनी याप्रकरणाची कोळसेवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली. महिला पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. वाळके याप्रकरणाचा तपास करत आहेत.

गच्चीवरून पडून मृत्यू

दुसऱ्या एका प्रकरणात बदलापूर येथे राहणारा दोन वर्षाचा मुलगा इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून खिडकीतून जमिनीवर पडला. त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. क्रिश खलबहादूर परिया (२) असे मृत बालकाचे नाव आहे.परिया कुटुंबीय बदलापूर येथे नवबालाजी सोसायटी भागात राहते. खलबहादूर परिया यांचा मुलगा क्रिश हा घराच्या पहिल्या माळ्यावर खेळत होता. खिडकीत खेळत असताना त्याचा तोल गेला. तो जमिनीवर पडला. तो गंभीर जखमी झाला. त्याला कुटुंबीयांनी डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी आणले. डाॅक्टरांनी त्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण उपचार सुरू असताना क्रिशचा मृत्यू झाला. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक जी. एस. मुसळे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader