कल्याण – डोंबिवली शहराच्या दोन वेगळ्या भागांमध्ये भरधाव वेगात असलेल्या आणि बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या चालकांनी दोन पादचारी वृध्द महिलांना ठोकर देऊन गंभीर जखमी केले. वाहन चालक घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेले. याप्रकरणी मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक आणि नवी मुंबई, अलिबाग, पनवेल भागात जाण्यासाठी बहुतांशी प्रवासी मधला मार्ग म्हणून कल्याण, डोंबिवली शहरातील रस्त्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर बाहेरच्या भरधाव वाहनांची संख्या अलीकडे वाढू लागली आहे. या वाहनांचा आता स्थानिकांना अपघात, कोंडीच्या माध्यमातून त्रास होऊ लागला आहे. मोठागाव रेतीबंदर माणकोली पुलामुळे ठाणे, मुंंबई अंतर कमी झाल्याने बहुतांशी प्रवासी डोंबिवली शहरातून प्रवास करतात. ही वाहने शहरातील नागरिकांना आता धोकादायक वाटू लागली आहेत. पंडित दिनदयाळ रस्ता, उमेशनगर रस्ता या वाहनांनी गजबजून गेलेले असतात.
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा भागातील फिफ्टी फिफ्टी ढाब्या समोरील रस्त्यावरून बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान हौसाबाई धोंडिबा ठोसर (९०) आणि त्यांची सून बाजारपेठेत खरेदीसाठी पायी चालल्या होत्या. रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक सासू, सुनांच्या पाठीमागून एक दुचाकी स्वार भरधाव वेगात आला. त्याने काही कळण्याच्या आत हौसाबाई ठोसर यांना पाठीमागून दुचाकीने जोराची धडक दिली. या धडकेत हौसाबाई जमिनीवर पडल्या. त्यांच्या कंबरेच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या कमरेच्या हाडाला चीर गेली आहे.
यावेळी हौसाबाई यांना रुग्णालयात नेण्याऐवजी दुचाकी स्वार घटनास्थळावरून पळून गेला. हौसाबाई यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हौसाबाई ठोसर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोरे तपास करत आहेत. दुसरी घटना पत्रीपुलाजवळील कचोरे गाव हद्दीत बुधवारी घडली आहे.
पत्रीपूल भागात राहणाऱ्या खातिजा शेख (६५) या मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता पत्रापुलाजवळील कचोरे गाव परिसरातून रस्त्याने पायी शाळेत आपल्या नातीला आणण्यासाठी जात होत्या. यावेळी भरधाव वेगात असलेल्या एका मोटार कार चालकाने तक्रारदार खातिजा यांना जोराची ठोकर दिली. या ठोकरीत खातिजा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. खातिजा शेख यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एस. बागड याप्रकरणाचा तपास करत आहेत.