ठाणे तसेच आसपासच्या शहरांत सोनसाखळ्या चोरणाऱ्या  दोन टोळ्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले असून, या दोन टोळ्यांतील सात जणांकडून ६१ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्य़ात चोरलेला सुमारे ३७ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला आहे.
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळणाऱ्या इक्बाल शमीम खान, शाहीदअली सर्फराज अस्नाअशेरी, अब्बास सल्लू जाफरीस, जाफर मनोज ऊर्फ जावेद इराणी या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट -१ने गजाआड केले. या चौघांनी ठाणे, कल्याण, उल्हासनगर परिसरात सोनसाखळ्या चोरल्याची कबुली दिली आहे. त्य़ांनी चोरलेला १८ लाख ५५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
ठाणे खंडणीविरोधी पथकाने सोनसाखळीच्या गुन्ह्य़ात आजम आलिशा इराणी, मोहमद ऊर्फ मम्मू ऊर्फ सांगा जाकीर सैय्यद, जाफर ऊर्फ संजय ऊर्फ टिनु आनंद मालिक सैय्यद या तिघांना अटक केली आहे. नौपाडा, वर्तकनगर, कळवा, कापुरबावडी,  आदी परिसरात सोनसाखळीचे गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली असून, त्यांच्याकडून १९ लाख ३७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.