दुचाकीवरून आपल्या घरी जाणाऱ्या माय लेकींपैकी आईच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वार चोरामुळे महिला जखमी झाल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ पश्चिमेतील मोहन सबर्बिया फेज एक येथे ही घटना नवरात्रीच्या पूर्वसंध्येला घडली. तर अंबरनाथ पूर्वेतील दुसऱ्या घटनेत आपल्या पतीसोबत फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरांनी पळवली आहे. या दोन्ही प्रकरांबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरांमुळे सण उत्सवांच्या तोंडावर महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> खराब रस्त्यांमुळे उरणमध्ये ‘धुळवड’, चालक-प्रवाशांना सक्तीचा मनस्ताप

अंबरनाथमध्ये सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ पहायला मिळतो आहे. एकीकडे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिला शक्तीचा जागर सर्वत्र होत असताना शहरात मात्र महिलांच्या सोनसाखळी चोरीची प्रकरणांत वाढ झाल्याचे दिसते आहे. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला झालेल्या दोन प्रकरणांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे. अंबरनाथ पश्चिमेतील मोहन सबर्बिया या गृहसंकुलाच्या फेज एक येथील घरी जाण्यासाठी शांती सेल्वकुमार आपल्या आईसोबत दुचाकीवरून आल्या होत्या. त्याच वेळी रात्री दोन इसम दुचाकीवरून आले. त्यांनी शांती सेल्वकुमार यांची आई विरम्मा यांच्या गळ्यावर थाप मारत सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विरम्मा खाली कोसळल्या. या दरम्यान त्यांच्या तोंडाला आणि नाकाला दुखापत झाली. याप्रकरणी शांती यांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अंबरनाथ पूर्वेतील महालक्ष्मी नगर भागात सोनसाखळीचा असाच प्रयत्न झाला.

हेही वाचा >>> पनवेल : पोयंजे गावात वृद्धाचा खून

सीमा गणेश पार्टे या आपल्या पतीसोबत महालक्ष्मी नगरच्य़ा गॅस गोदाम परिसरात फेरफटका मारत असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसमोर आले असता दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली आणि चोरटे पसार झाले. या प्रकारानंतर पार्टे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. त्यामुळे दोन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र नवरात्रीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या प्रकारामुळे महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.