भिवंडीत चाकूहल्ल्यात दोघांचा मृत्यू, चार जखमी

अन्सारी याने इम्तियाज यांच्याही छातीत चाकू खुपसला. तर हसीना, रेहान, अरिबा आणि हफिफा यांच्यावरही हल्ला केला.

ठाणे : भिवंडी येथील गैबीनगर भागात शुक्रवारी मोहम्मद अन्सारूलहक अन्सारी (४६) याने पूर्ववैमनस्यातून केलेल्या चाकूहल्ल्यात दोघांचा मृत्यू ओढवला, तर चार जण जखमी झाले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्सारी याला अटक करण्यात आली आहे.

या हल्ल्यात कमरूजमा अन्सारी (४३) आणि इम्तियाज खान (३५) यांचा मृत्यू झाला आहे, तर कमरूजमा यांची पत्नी हसीना (३६), मुलगा रेहान (१५), मुली अरिबा (१६) आणि हफिफा (११) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गैबीनगर येथील खान चाळीत कमरूजमा हा कुटुंबीयांसह राहत होता. त्याच्या शेजारीच आरोपी मोहम्मद अन्सारी हादेखील राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कमरूजमा यांची पत्नी हसीना आणि मोहम्मद अन्सारी या दोघांमध्ये वाद झाला होता. याचा राग अन्सारी याच्या मनात होता. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास कमरूजमा हे घराबाहेर उभे असताना अन्सारी तेथे आला. त्याने कमरूजमा यांच्या छातीत चाकूचा वार केला. कमरूजमा यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी हसीना, मुलगा रेहान, मुली अरिबा, हफिफा आणि शेजारी राहणारा इम्तियाज हे आले. अन्सारी याने इम्तियाज यांच्याही छातीत चाकू खुपसला. तर हसीना, रेहान, अरिबा आणि हफिफा यांच्यावरही हल्ला केला. इम्तियाज यांचा जागीच मृत्यू झाला. रहिवाशांनी  अन्सारी याला पकडले. तसेच कमरूजमा आणि त्यांच्या कुटुंबीयांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान कमरूजमा यांचा मृत्यू झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two killed four injured in knife attack by neighbour in bhiwandi zws