बदलापूर ग्रामीण पोलिसांत अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, दोघांना अटक
फलक लावण्याच्या वादातून बदलापूरजवळील कान्होर गावात दोघांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बदलापूरपासून जवळच असलेल्या कान्होर गावात १३ एप्रिल रोजी रात्री हा प्रकार घडला. डॉ. बाबासाहेब जयंती निमित्ताने फिर्यादीचा मुलगा आपल्या घराशेजारी फलक लावण्यासाठी शिडी घेऊ न गेला असताना शेजारी रहाणारे भास्कर देशमुख आणि राहुल देशमुख यांनी बॅनर लावण्यास विरोध केला. विरोध करत असताना या दोघांनी फिर्यादी महिलेच्या मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली, अशी तक्रार आहे. मुलाला मारहाण झाल्याने जाब विचारावयास गेलेल्या आईलाही मारहाण करण्यात आली. तसेच तिला शिवीगाळ करण्यात आली, अशी माहिती प्राथमिक चौकशी अहवालात नमूद करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे या परिसरातील वातावरण तंग बनले होते. याप्रकरणी ग्रामीण पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप करत मोठा जमाव पोलीस ठाण्याच्या परिसरात जमला होता. अखेर रात्री उशिरा याप्रकरणी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी भास्कर देशमुख आणि राहुल देशमुख यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या घटनास्थळी वातावरण शांत असल्याचेही त्यांनी सांगितले. अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधित कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.